
पंढरपूरमधील जुन्या बाजारपेठेतील मिठाई विक्री करणाऱ्या अनेक दुकानांमधून शिळ्या मिठाईची उघडपणे विक्री होते. मात्र अन्न व औषध प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये संपूर्ण राज्यभरामधून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक दाखल होतात. तसेच पंढरपूर तालुक्याच्या गाव खेड्यांमधूनही शेकडो नागरिक पंढरीत विविध वस्तूंच्या व साहित्याच्या खरेदीसाठी शहरात ये-जा करत असतात. इतर वस्तूंसोबतच या नागरिकांकडून तसेच भाविकांकडून मिठाईचीही खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र पंढरपूरमधील जुन्या बाजारपेठेतील मिठाई विक्री करणाऱ्या अनेक दुकानांमधून शिळ्या मिठाईची उघडपणे विक्री होते. मात्र अन्न व औषध प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामुळे जगभरात नावलौकीक झालेल्या पंढरपूरात सध्या जागोजागी उघड्यावर तसेच शिळ्या मिठाईची विक्री केलेली पाहायला मिळत आहे. नव्या पेठेतील वर्दळीच्या रस्त्यांवरील अनेक हॉटेलांमध्ये खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात उघड्यावर विक्री केल्यामुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. पंढरपूर शहर परिसरातील अनेक मिठाई विक्रीच्या दुकानातून केवळ नफा कमावण्याच्या हेतूने सामान्य नागरिक तसेच वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरू असल्याने याकडे राज्य सरकार तरी लक्ष देणार का नाही ते पहावे लागणार आहे.
कॉल घ्यायला अधिकाऱ्यांना नाही वेळ
पंढरपूर शहरातील अन्न व भेसळ प्रशासनाचा आजवरचा कारभार पाहता या विभागातील अधिकाऱ्यांना सर्वसामान्य लोकांचे तसेच तक्रारीसाठी आलेले कोणतेही कॉल घेण्यात स्वारस्य नसल्याचे दिसते. पंढरपूर शहरातील एका हॉटेलमधून एका वारकऱ्यांनी खरेदी केलेल्या बुंदीच्या लाडूमध्ये दुर्गंधी येत होती. याची तक्रार करण्यासाठी अन्न व भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता सदर अधिकाऱ्याने फोन उचलला नाही. त्यामुळे नक्की तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य पंढरपूरकर व येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना पडला आहे.
सरकार याकडे लक्ष देणार का?
पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना तसेच इथल्या नागरिकांना आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च केले जातात. अन्न व भेसळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विषबाधा होण्याची प्रकार येथे अनेकदा घडतात. मात्र अन्न व भेसळ प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याने राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या आरोग्याच्या मोहिमेला इथल्या यंत्रणेकडूनच केराची टोपली दाखवली जात आहे.