“माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव”, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा

जरांगे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली.

    जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी खळबळदनक दावा केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील हे नाव चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषण केले त्याचबरोबर महाराष्ट्र दौरा देखील केला. यानंतर आता जरांगे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली.

    राजसत्तेवरून बसून गृहखात्याचा गैरवापर

    माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूतीच्या अनुशंगाने प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाज जातीयवादी असता तर या महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, वसंतराव नाईक, मनोहर जोशी कधी मुख्यंमत्री होऊ शकले नसते. गोपीनाथ मुंडे यांची मुलगी दोनदा खासदार होऊ शकली नसती, पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे आमदार होऊ शकले नसते. मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होऊ शकले नसते. मराठा समाज हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता. मराठा समाजानेच तुम्हाला राजसत्तेवर बसवले. पण त्याच राजसत्तेवरून बसून गृहखात्याचा तुम्ही गैरवापर केला. मराठ्यांच्या मुलांवर केसेस केल्या, एसआयटी नेमून त्रास दिला. माझ्या कुटुंबियांवरही हल्ले करण्याचा डाव आखण्यात आला. ही पद्धत गृहमंत्र्यांना शोभणारी नाही. मी आणि माझे कुटुंब जरी डावावर लागले असले तरी मी सरकारला ऐकणारा नाही. सरकारला माझी निष्ठा विकत घेता येणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

    देवेंद्र फडणवीस हुकूमशहा आहेत

    माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याचा डाव आखला जात असल्याची माहिती मला मिळाली आहेल असा दावा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. पुढे ते म्हणाले, गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे. कारण मी त्यांचे ऐकत नाही. ते हुकूमशहा आहेत. त्यांना वाटतं ते म्हणतील तसंच व्हावं, नाहीतर ते तुरुंगात टाकतील. मी मागेही याबाबत बोललो होतो. माझ्याविरोधात एसआयटी स्थापन करणे, खोटे व्हिडीओ बनवणे, माझ्याविरोधात काही लोक मुंबईत नेऊन बसविणे, त्यांच्याकरवी आरोप करायला लावणे, असले प्रयोग करून झाले आहेत” असा आरोप देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.