पंतप्रधान मोदी यांचा आज मुंबईत रोड शो; मुंबई भाजपची यंत्रणा तयारीसाठी सज्ज

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी मुंबईत रोड शो करणार आहेत.

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी मुंबईत रोड शो करणार आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबईत येत असून, त्यांच्या स्वागतासाठी तसेच रोड शो यशस्वी करण्यासाठी मुंबई भाजपची यंत्रणा सज्ज झाली आहे.

    भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही मिळून मुंबईतील प्रत्येकी तीन लोकसभा मतदारसंघ लढवत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने मुंबईत राजकीय व्यूहरचना केली असून, त्याचा एक म्हणून आज मुंबईत मोदींच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.

    पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला संध्याकाळी पाच वाजता घाटकोपर पश्चिम येथून सुरुवात होईल. रोड शोची सुरुवात अशोक सिल्क मिल, घाटकोपर पश्चिम इथून होऊन पार्श्वनाथ चौक, घाटकोपर पूर्व इथे रोड-शो समाप्त होईल. या रोड शोमध्ये महायुतीचे नेते, लोकसभा उमेदवार सहभागी होणार आहेत.

    2004 मध्ये सोनिया गांधींचा ‘रोड शो’

    यापूर्वी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबईत रोड शो केला होता. या रोड शोला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर 2009 मध्येही असा रोड शो झाला होता. मधल्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुंबईत रोड शो केला होता.