पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांवर नाव न घेता टीका, अजित पवारांसमोरच वाचला पाढा

  अहमदनगर : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आज त्यांच्या हस्ते अहमदनगर येथील निळवंडे प्रकल्पाचे जलपूजन करून लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर साईमंदिराच्या सुसज्ज 12 हाॅलसह एसी दर्शनरांगेचे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर नगरमधील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

  शरद पवारांवर नाव न घेता टीका

  2014 च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेक वेळा राज्याचे कृषिमंत्री राहून गेले. मात्र त्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं, मात्र 2014 नंतर हे चित्र बदललं. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केलं, असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर

  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी शिर्डीजवळील काकडी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवार त्यांच्यासमोरच टीका केल्याचे दिसून आले. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून काम करत होते. व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो, मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले, परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडे तेरा लाख कोटी रुपयाच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

  बाबा महाराज सातारकरांना वाहिली श्रद्धांजली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरवात मराठीतून करीत शिर्डीच्या या पावन भूमीला माझे कोटी कोटी नमन’ भाषणाला सुरवात केली. मोदी यावेळी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी या पवित्र मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाले होते, त्यावेळी मला दर्शनाची संधी मिळाली होती. यावेळी सुरवातीलाच त्यांनी कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली देखील वाहिली. ते म्हणाले की, आज सकाळी देशाचं अनमोल रत्न, वारकरी संप्रदायाचं वैभव बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्यांनी जगाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या सहज वाणीतुन निघणाऱ्या ‘जय जय रामकृष्ण हरि’ने एक वेगळाच आनंद मिळत होता. मात्र आज त्यांचे देहावसान झाले, त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली!’

  आता एक थेंबही वाया घालवू नका….

  मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करत असून मागील दहा वर्षांत देशातील नागरिकांना निराश केले नाही. देशातील गरीब परिवारांना पुढे जाण्याचा योग येवो हे आमचे ध्येय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारचा बजेटही वाढत आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत गरीबांना मोफत उपचारांसाठी 70 हजार कोटी खर्च केले असून गरीबांच्या घरांसाठीही सरकारने 40 लाख कोटी रूपये खर्च केले. हर घर जल पोहोचवण्यासाठीही आतापर्यंत 2 लाख करोड रूपये खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. शेतकऱ्यांना आत एकूण 12000 रूपये मिळतील. आपल्याला शेतकऱ्यांच्या नावावर मतं मागून थेंब थेंब पाण्यासाठी तरसवले आहे. महाराष्ट्राला 5 दशकांपासून ज्या निळवंडे धरणाचे वेध होते, ते काम आज पूर्ण झालं. ज्या कामांचं भूमिपूजन मी केलं, त्याच उद्घाटन करण्याचा योगही मलाच आला. आज जेव्हा या डॅममधून पाणी सुरू झाले, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. आता एक थेंबही वाया घालवू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना करत आम्ही चांगल्या नियतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.