उद्धव ठाकरे हे नकली संतान; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर संजय राऊतांचा संताप

उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणाल्यामुळे ठाकरेसेना आक्रमक झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार निशाणा साधला होता. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. तसेच ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी सभांमध्ये जहरी टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणाल्यामुळे ठाकरेसेना आक्रमक झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    नरेंद्र मोदी यांचे अत्यंत दळभद्री विधान

    नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ अशी टीका केली. यावरुन संजय राऊत आक्रमक झाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी आणि भाजप यांना टोला लगावला, खासदार राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. या दोघांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना माननाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तेलंगणात जाऊन उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

    ‘५० खोके, एकदम ओके’, हे कुणाला म्हटले जाते?

    ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भर सभेमध्ये श्रीकांत शिंदे यांनी कपाळावर मेरा बाप गद्दार है असे लिहा अशी टीका केली. यावरुन जोरदार राजकारण रंगले. यावर देखील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० सहकाऱ्यांना पूर्ण देश गद्दार म्हणून ओळखतो. कोण काय बोलले, हे मला माहीत नाही. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जे लोक एनडीएत गेले, लोक त्यांना गद्दार म्हणून हिणवत आहेत. ‘५० खोके, एकदम ओके’, हे कुणाला म्हटले जाते? असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.