पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कोकणात! सिंधुदुर्गमधील भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकांना उपस्थिती, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातील नौदलाच्या प्रात्यक्षिके तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरून भारतीय नौदलाच्या जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या "ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे" साक्षीदार होतील, असे भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. नौदल दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून नौदल आपली लढाऊ क्षमता प्रदर्शित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत, तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेदेखील अनावरण करणार आहेत.

  PM ​Narendra Modi : चार महत्त्वाच्या राज्यांचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्री मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात येत असल्याने या भेटीला मोठे महत्त्व आहे. कोकणातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोकणात येणार आहेत. आज सायंकाळी ४.१५ च्या सुमारास ते महाराष्ट्रात येतील. त्यानंतर, सिंधुदूर्ग येथे ‘नौदल दिन २०२३’ कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील.

  राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित

  पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील. अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणेदेखील उपस्थित राहणार आहेत.

  आठवडभराआधीच येथे कडक सुरक्षा तैनात

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत. स्वच्छता, सुशोभिकरणावर भर देण्यात आला असून चोख सुरक्षाही बजावण्यात आली आहे. मोदी सिंधुदूर्गात येणार असल्याने आठवडभराआधीच येथे कडक सुरक्षा तैनात होती. अनेक बाजारपेठे मर्यादित कालावधीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

  दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील‘नौदल दिन २०२३’हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करीत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले, तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत साकारण्यात आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला.

  राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश

  दरवर्षी, नौदल दिनानिमित्त, भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली माहिती

  याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते, जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा सिंधुदुर्गचा विषय निघेल तेव्हा आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो की, तुम्ही आला होता त्याच भागाबद्दल बोलत आहोत. येथे पर्यटन आणायचं आहे, इतरही अनेक गोष्टी करायच्या आहेत. पंतप्रधान सिंधुदुर्गात आले किंवा त्यांनी पाय ठेवला म्हणजे काहीतरी द्यायलाच पाहिजे असे काही नाही. तशी आमची, भाजपाची किंवा जनतेची मागणी नाही. पत्रकारांची तशी काही इच्छा असेल तर पंतप्रधान आल्यावर तुम्ही त्यांना सांगा. उगाच कुठेतरी चांगल्या वातावरणाला कलाटणी देऊ नका, असे राणे यांनी म्हटले आहे.