‘यंदा कॉंग्रेस विरोधी बाकावरदेखील नसेल…’ नाशिकमधून नरेंद्र मोदी यांचा एल्गार

नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

  नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरु केला आहे. पहिल्या चार टप्प्यामध्ये देखील नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये जोरदार प्रचार केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. यंदा कॉंग्रेस विरोधी बाकादेखील नसेल अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

  नाशिकमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले. मोदी म्हणाले, “तुमची सेवा हेच माझ्या जीवनाचं सर्वात मोठं लक्ष्य आहे. तुम्ही गेल्या दहा वर्षात माझं काम पाहिलं आहे. आता मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो आहे. तिसऱ्या कार्यकाळासाठी आशीर्वाद मागायला आलोय. विकसित भारत करण्यासाठी आशीर्वाद मागायला आलो आहे, “अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिककरांना भावनिक आवाहन केले.

  काँग्रेस प्रचंड प्रमाणात हारणार

  पुढे त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “निवडणूकीमध्ये एनडीए आघाडीला मोठा विजय मिळणार आहे. हे इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्याच्या विधानामधून देखील कळत आहे. त्यांना माहीत आहे की,  इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेस प्रचंड प्रमाणात हारणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही. त्यामुळेच इथल्या नेत्याने त्यांनी सर्व छोटे छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणुका संपल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजे आपले आपले शटर बंद केले पाहिजे. त्यांना वाटतं सर्व दुकान त्या दुकानात गेले तर काँग्रेस विरोधी पक्ष बनेल. ही यांची परिस्थिती आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर घणाघात केला.

  काँग्रेसच्या पुढे गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा

  लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचारामध्ये भाजपने राम मंदिर या मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये वापरला आहे. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राम मंदिर विषयावर नाशिकमध्ये हात घातला आहे. कॉंग्रेसने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण नाकारले होते याची आठवण नरेंद्र मोदी यांनी जनतेला करुन दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसचे लोक मंदिरावरुन वेडेवाकडे काहीतरी बोलत असतात, असा आरोप त्यांनी केला. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या काँग्रेसला डोक्यावर घेतलं जात आहे. राज्यातील स्वाभिमानी जनता हे पाहत आहे. राज्यातील लोकांचा राग वाढला आहे. काँग्रेसच्या पुढे गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचे महाराष्ट्राने ठरवले आहे,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर प्रचार सभेमध्ये केली आहे.