पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; काळाराम मंदिराच्या दर्शनाने लोकसभा प्रचाराचा शुभारंभ

    नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराचे (Kalaram Temple) दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी रामापुढे नतमस्तक होत महंतांच्या साक्षीने पुजाअर्चना केली. यानंतर त्यांनी रामतीर्थ (Ram Teerth) येथून गोदावरीची पुजा देखील केली. नरेंद्र मोदी यांनी गोदावरी तीरावर असणाऱ्या रामकुंडावर जलपूजन केले. गोदावरीची पुजा करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांचे जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत आणि जय श्रीरामांच्या (Prabhu Shree Ram) जयघोषामध्ये स्वागत करण्यात आले.

    नाशिकमधील पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरची चौकापासून पंतप्रधान मोदींनी रोड शो केला. या रोड शोप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नाशिकरांनी त्यांचे फुले उधळून आणि जय श्रीरामचा नारा दिला. तसेच मोदी यांनी दर्शनानंतर भजनामध्ये देखील सहभाग घेतला. वारकारी संप्रदायाने केलेल्या भजनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भजनामध्ये दंग झालेले दिसून आले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभेच्या निवडणूकीपूर्वीचा हा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी काळाराम मंदिराच्या दर्शनासह मोदी हे मुंबईमध्ये करोडो रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने राज्यभरामध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ ऱ्यानंतर राज्यामध्ये आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रचाराचे बिगुल वाजणार आहे.