पंतप्रधानांनी आपल्या गुरूविषयी वापरलेली भाषा निषेधार्ह; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

आपल्या गुरूविषयी असे शब्द वापरणे योग्य नाही, असा टोला काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी लगावला.

    पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जेष्ठ नेत्यांची राज्यामध्ये सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांची पुण्यामध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’ म्हटले होते. यावरुन आता कॉंग्रेस नेते उल्हास पवार आक्रमक झाले आहेत. पंतप्रधानांनी शरद पवार यांना आपले गुरू संबोधले होते. त्यामुळे आपल्या गुरूविषयी असे शब्द वापरणे योग्य नाही, असा टोला काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी लगावला.

    राजकारणाचा स्थर किती घसरला आहे

    कॉंग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उल्हास पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे. उल्हास पवार म्हणाले, “पंतप्रधानांनी शरद पवार यांना आपले गुरू संबोधले होते. त्यामुळे आपल्या गुरूविषयी असे शब्द वापरणे योग्य नाही. मोदी यांनी वापरलेला वापरलेले शब्द पाहता राजकारणाचा स्थर किती घसरला आहे, हे कळते. मोदींची ही भाषा राजकी़य संस्कृतीसाठी दुदैवी असून गेल्या दहा वर्षात‌ केवळ जुमलेबाजी केल्याने मोदींना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, खुर्च्या मोकळ्या असतात, त्यामुळे मोदी आत्मविश्वास गमावत आहेत.”

    त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे

    पुढे उल्हास पवार म्हणाले, पवार म्हणाले, की पंतप्रधानांच्या सभांवेळी निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या मोकळ्या रहात आहेत. पंतप्रधान लोकसभा किंवा विधानसभेला एखाद्या राज्यात पाच सात‌ सभा घेतात, मात्र मोदी एका राज्यात महापालिकेच्या निवडणुकीसारखे एका जिल्ह्यात दोन दोन सभा घेत आहेत. त्यांना स्वत:च्या राज्यात सभा घ्यावी लागते. याचा अर्थ त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. सत्तर वर्षात काँग्रेसने काय‌ केले यापेक्षा गेल्या दहा वर्षात‌ त्यांनी काय केले हे सांगितले पाहिजे.