कार्तिकी एकादशीनिमित्त पीएमपीएमएल सज्ज! यात्रेसाठी तब्बल ‘इतक्या’ जादा बसेस

कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथील यात्रेसाठी जादा बससेवा देण्यात येणार आहेत. बुधवारपासून (दि. ०६) ते १२ डिसेंबर २०२३ यादरम्यान जादा बसेस देण्यात येणार आहे.  

    पुणे : कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथील यात्रेसाठी जादा बससेवा देण्यात येणार आहेत. बुधवारपासून (दि. ०६) ते १२ डिसेंबर २०२३ यादरम्यान जादा बसेस देण्यात येणार आहे. तसेच ८ डिसेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ या चार दिवसांसाठी रात्रीही बससेवा देण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे.

    आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी जादा बससेवा देणे आवश्यक असल्यामुळे शहरातील बसमार्गावरील संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून यात्रा स्पेशल बससेवा देण्यात येणार आहे. आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक २६४ ही भोसरी ते पाबळ संचलनात असलेली बस आणि मार्ग क्र. २५७ आळंदी ते मरकळ या मार्गावर संचलनात असलेली बस यात्रेच्या काळात संपूर्णतः बंद राहतील. तरी संबंधित मार्गावरील प्रवाशी नागरिकांनी ‘पीएमपीएमएल’ला सहकार्य करावे असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

    यात्रेसाठी जादा बससेवा देण्यात येणारी ठिकाणे / स्थानके

    स्वारगेट ते आळंदी, हडपसर ते आळंदी, पुणे स्टेशन ते आळंदी, म.न.पा. भवन ते आळंदी, निगडी ते आळंदी, पिंपरी ते आळंदी, चिंचवड ते आळंदी, देहूगांव ते आळंदी, भोसरी ते आळंदी आणि रहाटणी ते आळंदी अशा बससेवा देण्यात येणार आहेत.

    यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या जादा बससेवेसाठी रात्री १० वाजेनंतर (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरा पेक्षा पाच रूपये जादा तिकिट दर आकारणी करण्यात येईल. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकासाठी यात्रा कालावधीत रात्री १० वाजेनंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.