पीएमआरडीए पुरस्कृत महाओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धा; 28 देशांतील खेळाडूंचा असणार सहभाग

  पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने (एमएसएलटीए)च्या व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महाओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 28 देशांतील अव्वल टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू सुमित नागलचादेखील समावेश असणार आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथे 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

  या स्पर्धेसाठी पाच वर्षांचा करार 

  पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेसाठी पाच वर्षांचा करार केला असुन 17 ते 25 फेब्रुवारी   2024 या कालावधी दरम्यान रंगणारी ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.

  महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग आयुक्तांकडून माहिती 

  पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त राजेश देशमुख(आयएएस)म्हणाले की, पीएमआरडीए संचलित महाओपन चॅलेंजर ही एमएसएलटीएच्या वतीने आयोजित केली जाणारी भारतीय टेनिसच्या हंगामातील एक स्पर्धा आहे. पुणे शहराची प्रतिमा सार्वत्रिक स्तरावर उंचावणाऱ्या अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पाठिंबा देताना क्रीडा विभागाला आनंद होत आहे. या निमित्ताने खेळाला प्रोत्साहन मिळत असून, भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा उपलब्ध होत असल्यामुळे क्रीडा आणि पीएमआरडीएच्यावतीने स्पर्धेला समर्थन दिले, असेही राजेश देशमुख यांनी सांगितले.

  स्पर्धेसाठी 130000 अमेरिकन डॉलर्स पोरितोषिक रक्कम

  या स्पर्धेसाठी 130000 अमेरिकन डॉलर्स पोरितोषिक रक्कम (1.07  कोटी रुपये) ठेवण्यात आली असून विजेत्याला 100एटीपी गुण आणि 17650 डॉलर्स (14.50लाख रुपये), तर उपविजेत्याला 60एटीपी गुण आणि 10380डॉलर्स(8.5 लाख रुपये) अशी  पारितोषिक देण्यात येणार आहेत. तर, पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूलाही 1270 डॉलर्स (1.04लाख रु.), तसेच पात्रता फेरीतील खेळाडूला 380 डॉलर्स (31हजार रु.) इन्सेन्टिव्ह मिळणार आहे.

  शहरात यशस्वीरीत्या आयोजन

  एमएसएलटीएचे चेअरमन आणि स्पर्धा सहसंचालक प्रशांत सुतार म्हणाले की, या चॅलेंजर स्पर्धेचे शहरात यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आम्हाला आनंद होत असून या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना बहुमोल एटीपी गुण आणि अनुभव मिळणार आहे. मुंबई येथे एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए 1लाख 25हजार डॉलर महिला टेनिस स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर ही महा ओपन एटीपी चॅलेंजर स्पर्धा महाराष्ट्रातील टेनिस क्रीडाप्रकाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी एमएसएलटीएचा दूरदर्शी प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचेही सुतार यांनी सांगितले. भारताच्या रामकुमार रामनाथन आणि ससीकुमार मुकुंद या दोन्ही खेळाडूंना मुख्य फेरीसाठी वाईल्ड प्रदान करण्यात आले असल्याचे सुतार यांनी नमूद केले.

  आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित  

  एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, आणखी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करताना एमएसएलटीए ला अतिशय आनंद होत आहे. यंदाच्या वर्षात एमएसएलटीएने 4लाख 25हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या (3.5कोटी रुपये) स्पर्धांचे आयोजन केले, हा क्रिडा क्षेत्रातील एक उच्चांक असून महाराष्ट्र राज्य शासन आणि विविध प्रायोजक यांच्या संपूर्ण पाठिंब्यामुळेच आम्हाला हे शक्य झाले. या सर्व स्पर्धांच्या आयोजनाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशभरातील गुणवान व उदयोन्मुख टेनिस पटूना साहाय्य करता आले याचे आम्हाला विशेष समाधान वाटत आहे.