पंतप्रधानांच्या बुस्टर लसीकरणाच्या घोषणेचे स्वागत, महाराष्ट्रात नियोजन : आरोग्यमंत्री टोपे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. लसीकरणाबाबत आपण प्रगती करत आहोत. पंतप्रधानांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सर्वात पहिली घोषणा म्हणजे १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करणार.

  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ नवतरूणांच्या लसीकरणासंबंधी तसेच बुस्टर डोस बाबत घोषणा केल्यानंतर राज्यात याबाबत नियोजन केले जाणारअसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिली आहे.

  घोषणेचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्याकडून स्वागत
  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या तसेच नवतरूणांना लस देण्याच्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी स्वागत केले आहे. पंधरा ते अठरा वर्षाच्या वयोगटातील मुलांचे लसीकरण तसेच बूस्टर डोस साठी १९ नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने आपण केंद्रीय आरोग्य मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली होती. आज पंतप्रधानांनी केलेल्या या  घोषणेची खरी गरज होती. दरम्यान लसीकरणाचे राज्यात योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल. याशिवाय सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे देखील टोपे म्हणाले.

  नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा
  ते म्हणाले की, बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील ७ डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असे टोपे म्हणाले.

  फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. लसीकरणाबाबत आपण प्रगती करत आहोत. पंतप्रधानांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सर्वात पहिली घोषणा म्हणजे १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करणार. दुसरी घोषणा म्हणजे आरोग्य कर्मचारी  अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले. तिसरी घोषणा ६० वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले.