विषारी ताडीने घेतला दोघांचा बळी; माळेगाव येथील घटना

माळेगाव बुद्रुक येथे विषारी ताडी पिल्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. विशेष म्हणजे ताडी पिणारे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या प्रकरणी ताडी विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बारामती : माळेगाव बुद्रुक येथे विषारी ताडी पिल्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. विशेष म्हणजे ताडी पिणारे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. दरम्यान या प्रकरणी ताडी विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे माळेगावात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

    राजू लक्ष्मण गायकवाड (वय ३५), हनुमंता मारुती गायकवाड (वय ४०, दोघेही रा. चंदननगर, माळेगाव बुद्रुक, ता. बारामती), अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर भैरु चिनापा गायकवाड, भिमा चिनाप्पा गायकवाड, भीमा कलाप्पा भोसले ह्या तीन युवकांवर बारामती येथे उपचार सुरू आहेत.

    दरम्यान, याबाबत अरुण सनी भोसले (रा.चंदननगर माळेगांव) फिर्याद दिली असून संशयित आरोपी संदिप मोहन साठे, मोहन साठे,मोहनची पत्नी ( सर्व रा. विक्रमनगर माळेगांव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदिप मोहन साठे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.

    चंदननगर परिसरावर शोककळा

    मयत राजू गायकवाडच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे, तर हनुमंता गायकवाडच्या मागे पत्नी दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मृत्यूमुळे चंदननगर भागात मोठा आक्रोश पहावयास मिळाला.