ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जाताना पोलिसाचा अपघात; गंभीर जखमी होऊन मृत्यू

पोलीस ठाण्यातून ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असलेल्या पोलीस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाला. बंगळुरू-मुंबई महामार्गावर रावेत येथे पोलीस अंमलदाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

    पिंपरी : पोलीस ठाण्यातून ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असलेल्या पोलीस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाला. बंगळुरू-मुंबई महामार्गावर रावेत येथे पोलीस अंमलदाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

    सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन नरुटे हे देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सोमवारी डे शिफ्ट झाल्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून घरी जाण्यासाठी निघाले. बंगळुरू-मुंबई महामार्गावरून वाकडकडे जात असताना रावेत येथे त्यांच्या दुचाकीला (एमएच १४/जीव्ही ७७५०) भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली.

    नरुटे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. नरुटे यांच्यामागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.