वृद्धाला मारहाण करणं पोलिसाला चांगलंच भोवलं; आंधळगाव ठाणेदाराची तडकाफडकी बदली

मोहाडी तालुक्यातील आंधळगावच्या ठाणेदारांनी एका वृद्धाला धक्काबुक्की केल्याने त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. याची दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्यांचे स्थानांतरण केले.

    भंडारा : मोहाडी तालुक्यातील आंधळगावच्या ठाणेदारांनी एका वृद्धाला धक्काबुक्की केल्याने त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. याची दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्यांचे स्थानांतरण केले.

    आंधळगाव ठाणेअंतर्गत येणाऱ्या उसर्रा येथील सुधाकर बोपचे यांची गावात मालकीची जमीन आहे. परंतु, या जागेवर तुमसर येथील अग्रवाल यांनी दावा केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या जागेवर बांधकाम करत असल्याची माहिती अग्रवाल यांनी आंधळगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सुधाकर बोपचे यांना विचारपूस करत होते. तितक्यात पोलिस व बोपचे यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचवेळी ठाणेदार राजकुमार यांनी त्यांना जोरदार धक्का दिला. यात बोपचे खाली पडल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त निघू लागले. त्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार बोपचे यांनी आंधळगाव ठाण्यात दिली.

    रक्त निघूनही पोलिसांनी हे प्रकरण अदखलपात्र केले. परंतु, नाकातून रक्त निघत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. त्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांनी ठाणेदार राजकुमार यांचे स्थांनातरण करून त्यांच्याजागी सोनवाने यांची नियुक्ती केली.