दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

गुन्हे शाखा युनिट 5 च्या (Crime Branch Unit 5) पथकाने गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून यशोधरानगर ठाण्यांतर्गत धाड टाकून दरोड्याच्या तयारीत गोळा झालेल्या 6 आरोपींना अटक केली.

    नागपूर : गुन्हे शाखा युनिट 5 च्या (Crime Branch Unit 5) पथकाने गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून यशोधरानगर ठाण्यांतर्गत धाड टाकून दरोड्याच्या तयारीत गोळा झालेल्या 6 आरोपींना अटक केली.

    जैनूल आबेदीन सलीम कुरेशी (वय 29 ), मो. मुजम्मिल आरीफ कुरेशी, (वय 24 ), हाशिम निसार कुरेशी (वय 25, तिन्ही रा. गड्डीगोदाम), नावेद अहमद शेख (वय 24 रा. वंजारीनगर), आकाश संतोष कटारे (वय 25, रा. आनंदनगर) आणि रमन दामोदर मेश्राम (वय 40 रा. संजय गांधीनगर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अटकेतील आरोपींवर यापूर्वीही गुन्हे नोंद झाले आहेत.

    मंगळवारी रात्री गुन्हे शाखेचे पोलिस परिसरात गस्त घालत होते. राणी दुर्गावती चौकाजवळील एनआयटी कॉम्प्लेक्समागे काही असामाजिक तत्व गोळा असून, काहीतरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी परिसरात घेराबंदी करून आरोपींना अटक केली. झडतीमध्ये त्यांच्याजवळ 2 चाकू आणि मिरची पावडर मिळाले. एका आरोपीच्या खिशात पोलिसांना मेफेड्रॉन ड्रग्सही मिळाले. पोलिसांनी त्यांच्याकडून 6 मोबाईल आणि 2 दुचाकी वाहनांसह 3.13 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

    आरोपींवर यशोधरानगर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भोपळे, विक्रांत धारकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल रोटे, आशीषसिंह ठाकूर, सहाय्यक फौजदार राजेश लोही, पोलिस हवालदार प्रमोद वाघ, गौतम रंगारी, महादेव थोटे, भीमराव बांभल, टप्पूलाल चुटे, राजू टाकळकर, सचिन चव्हाण, अमोल भक्ते आणि आशिष पवार यांनी केली.