
शनिवारी सकाळी बाँबे रेस्टारंट चौकातील उड्डाण पुलाजवळ पोपटी रंगाची एक बेवारस प्रवासी बॅग आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली होती.
सातारा : पुसेसावळीतील घटनेमुळे पोलीस दलावर प्रचंड ताण आला आहे. त्याचे अल्प पडसाद शांततेच्या मार्गाने उमटत असताना शनिवारी सकाळी बाँबे रेस्टारंट चौकातील उड्डाण पुलाजवळ पोपटी रंगाची एक बेवारस प्रवासी बॅग आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली होती.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच बाँब शोधक यंत्रणेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या बेवारस बॅगेची शहनिशा केली. सुदैवाने त्यात काही आक्षेपार्ह आढळले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती.
शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जगरहाटी सुरु होत असताना बाँबे रेस्टारंटजवळ असलेल्या उड्डाण पुलाजवळ पोपटी रंगाची एक बेवारस बॅग आढळू आली. येणारे, जाणारे वाहनधारक, नागरिक याकडे पहात निघून जात होते. खूप वेळ बॅग कोणीच उचलत नसल्याचे लक्षात आल्यावर काही सुजाण नागरिकांनी ही बाब पोलीस ठाण्यात कळवली. यानंतर पोलिसांनी सकाळी सकाळीच याची गांभीर्याने दखल घेतली.
बेवारस बॅग आहे म्हटल्यावर मग सगळी यंत्रणा सतर्क झाली होती. त्यासाठी बाँब शोधणारी यंत्रणा, डॉगस्कॉड व बाँब शोधक पथकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. डॉगस्कॉडमधील श्वानांना बॅगेजवळ नेण्यात आले. श्वान तिथे घुटमळले. मात्र, श्वानाकडून त्यात आक्षेपार्ह काही असल्याचे संकेत मिळाले नाहीत. मग बाँबशोधक यंत्राने बॅगेजवळ जावून तपासणी करण्यात आली. त्यातही काही आढळले नाही. शेवटी आकडा घेवून बाँब शोधक पथकातील कर्मचाऱ्याने ती बॅग उघडी केली. ओढत नेली. त्यावेळीही काहीही न घडल्याने मग नागरिकांसह सर्वांच्या जीवात जीव आला.
वाहने थांबवून केली तपासणी
बॅगेची तपासणी सुरु असताना इतर वाहनांचीही ये- जा सुरु होती. त्या वाहनांना थांबवण्याची कसरत करत पोलिसांना बेवारस बॅगेची तपासणी करावी लागत होती. मात्र, बॅगेमध्ये काहीही घातक पदार्थ आढळून आला नाही. मात्र, हे सिध्द होईपर्यंत पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती.
खोडसाळपणा केल्याची चर्चाही
दरम्यान ही बॅग पोलिसांनी जप्त केली असून कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याची चर्चाही परिसरात होती. मात्र सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यास ती बॅग कोणी ठेवली होती याचाही लवकरच शोध लागू शकतो. पोलीस यंत्रणा याबाबत तपास करत असल्याचे सांगण्यात आले.