ट्रक सोडण्यासाठी लाचेची मागणी; एक लाखावरून 70 हजारांत तडजोड, लाच स्वीकारताना पोलीस हवालदार अटकेत

नाशिक तालुका पोलीस ठाण्यांतर्गंत विल्होळी पोलीस चौकी येथे जमा केलेला ट्रक सोडण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील हवालदाराने एक लाखाच्या लाचेची (Bribe Case) मागणी केली होती.

    पंचवटी : नाशिक तालुका पोलीस ठाण्यांतर्गंत विल्होळी पोलीस चौकी येथे जमा केलेला ट्रक सोडण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील हवालदाराने एक लाखाच्या लाचेची (Bribe Case) मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच एका ट्रान्सपोर्ट चालकांच्या मध्यस्थीने पंचवटी परिसरातील हिरावाडीत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ अटक केली आहे.

    मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी गावाजवळ असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले (नेमणूक-नाशिक तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत विल्होळी पोलीस चौकी, नाशिक ग्रामीण) याने एक ट्रक अडविला होता. हा ट्रक कुठलीही कारवाई न करता सोडून देण्याच्या मोबदल्यात त्याने एक लाख रुपये मागितले होते. त्यामुळे ट्रक चालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

    त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या परिसरात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे ३५ हजार रुपये घेण्यासाठी तरुण तोडी हा आला असता त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहाथ अटक केली.

    ७० हजारांत तडजोड

    हवालदार मल्ले आणि ट्रक चालकामध्ये तडजोडी अंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्याअनुषंगाने ठरलेल्या ७० हजार रुपयांपैकी ३५ हजार रुपये पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तरुण मोहन तोडी (वय ४३, रा. हिमालया बेकारीसमोर जाजूवाडी, इंद्रकुंड, पंचवटी) यांच्याकडे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हिरवादी येथील ओम नागपूर ट्रान्सपोर्ट येथे देण्याचे ठरले होते.