Chhagan Bhujbal
संग्रहित फोटो

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservation) मुद्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना देण्यात येत असलेल्या धमक्या व त्यांच्या निवासस्थान तसेच कार्यालयावर हल्ला करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने शहर पोलीस यंत्रणा सावध झाली आहे.

    नाशिक : मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservation) मुद्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना देण्यात येत असलेल्या धमक्या व त्यांच्या निवासस्थान तसेच कार्यालयावर हल्ला करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने शहर पोलीस यंत्रणा सावध झाली आहे. भुजबळ यांच्या व्यक्तिगत सुरक्षेत वाढ करण्याबरोबरच भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

    छगन भुजबळ यांचे समर्थकही सजग झाले असून, त्यांनीही बंगल्याभोवती पहारा देणे सुरू केले आहे. विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या चर्चेत भाग घेताना छगन भुजबळ यांनी बुधवारी (दि.१३) आपल्याला मारण्याचा कट रचला जात असल्याचा गौप्यस्फोट केला असून, पोलिसांच्या अहवालात तसे नमूद करण्यात आल्याचे म्हटले आहे.

    आपल्याला गोळी झाडण्यात येणार असल्याचे तसेच घरावर व बंगल्यावर हल्ला करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्याचे विधिमंडळात सांगितले. शासनाने या धमकीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

    येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी सुरू

    भुजबळ यांच्या नाशिकच्या भुजबळ फार्मभोवती पोलीस बंदोबस्त उभा केला आहे. बंगल्याभोवती 24 तास पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच तेथे येणाऱ्या-जाणाऱ्या अभ्यागतांचीही चौकशी करून आतमध्ये सोडले जात आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्याने भुजबळ हे नागपूर येथे आहेत. दुसरीकडे भुजबळ यांना देण्यात आलेल्या धमकीमुळे ओबीसी कार्यकर्ते देखील संतप्त झाले असून, त्यांनी देखील जशास तसे उत्तर देण्याची तयारी चालविली आहे.