
गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार व खाजगी इसम अशा तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
वडगाव मावळ : गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार व खाजगी इसम अशा तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक पसार झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१३) लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली.
पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे (वय ५०), सहाय्यक फौजदार कुतुबुद्दीन गुलाब खान (वय ५२), खाजगी इसम यासीन कासम शेख (वय ५८), अशी कारवाई केलेल्या पोलिसांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची गॅस एजन्सी आहे. त्या एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस अधिकाऱ्यांनी केली. तडजोडी अंती दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार व खाजगी इसम यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सहाय्यक फौजदार मुश्ताक खान, कर्मचारी अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, पूजा डेरे, चालक दामोदर जाधव व चंद्रकांत कदम आदींनी केली.