विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची धाड, पळताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशातच विरारमध्ये एका गणेशोत्सव मंडळावर पोलिसांंनी छापेमारी केली. मंडपात पत्त्यांचा डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर ही धाड टाकण्यात आली. यावेळी पळून जाताना 19 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 

    राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशातच विरारमध्ये एका गणेशोत्सव मंडळावर पोलिसांंनी छापेमारी केली. मंडपात पत्त्यांचा डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर ही धाड टाकण्यात आली. यावेळी पळून जाताना 19 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

    पोलिसांच्या हलगर्जीपणामुळंच मुलाचा मृत्यू 

    त्यामुळं गावात तणावाचं वातावरण होतं. खबरदारी म्हणून पोलिसांनी संजीवनी हॉस्पिटलमध्ये बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळंच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकण्याची गरज नव्हती. पोलिसांनी वेळीच प्राथमिक उपचार केले असते, तर त्याचा जीव वाचला असता, असा आरोप मृत प्रचितच्या नातेवाईकांनी केला.

    मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

    मुलाला मारहाण केली नाही. धावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांनी सांगितलं. आम्ही मंडपावर प्रत्यक्ष छापा टाकला नाही. रात्री पोलिसांचं फक्त गस्तीचं वाहन जात होतं. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणवर कर्पे यांनी सांगितलं की, पोलीस त्यांना पकडतील या भीतीनं मुलं पळून गेली. त्यातच पळताना त्यातील एक मुलगा पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    काय झालं नेमकं?

    आगाशी जवळील गणेशोत्सव मंडपात काही तरूण मुले जागरण करत पत्ते खेळत होती. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्नाळा पोलिसांचे गस्तीवरील वाहन छापा टाकण्यासाठी आले. पोलिसांना पाहून मुलांची पळापळ सुरू झाली. पळत असताना प्रचित विनोद भोईर (१९) हा मुलगा खाली कोसळला. त्याला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.