ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचूुन केली अटक; गुन्हे शाखेची कारवाई

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मेफेड्रॉन ड्रग्स (एमडी) ची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना सापळा रचून अटक केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 6.99 लाख रुपये किंमतीचा माल जप्त केला.

    नागपूर : मेफेड्रॉन ड्रग्स (एमडी) ची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 6.99 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

    मिलिंद प्रेम हिरानी (वय 24, रा. श्रीनगर, मानेवाडा रिंगरोड) आणि सौरभ गणपत हनवते (वय 21, रा. शिवशक्तीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मिलिंद अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत सक्रीय आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे 7 गुन्हे नोंद आहेत. सौरभ हा वर्धा येथील रहिवासी आहे.

    नागपुरात खासगी संस्थेत काम करत होता. दोघांनाही अंमली पदार्थांचे व्यसन जडले. व्यसन पूर्ण करण्यात पैशांचा अडथळा येत असल्याने त्यांनी स्वतः माल विकण्यास सुरुवात केली. मिलिंद वेगवेगळ्या भागात जाऊन माल विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    पोलिसांनी आपल्या पंटरला त्याच्या मागावर लावले. जवळपास 6 तासांच्या प्रतीक्षेनंतर मिलिंद आणि सौरभ दिघोरी चौकात माल देण्यासाठी आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. झडतीमध्ये त्यांच्याजवळ 13.41 ग्रॅम एमडी पावडर मिळाले.