राहुल गांधींची सभा उधळण्याचा मनसेचा इशारा, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

राहुल गांधींची सभा उधळण्याचा इशारा मनसेकडून (MNS) देण्यात आला आहे.अशातच चिखलीमध्ये मनसे नेत्यांचा ताफा अडवण्यात आला आहे.

    बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याला सर्व पक्षांकडून विरोध होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या प्रकरणी आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.  काही मनसे नेते बुलढाण्यातील चिखलीमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधींची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा मनसेकडून (MNS) देण्यात आला आहे. अशातच चिखलीमध्ये मनसे नेत्यांचा ताफा अडवण्यात आला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

    मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असं मनसेचं म्हणणं आहे. या ठिकाणी आता मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात ‘पप्पू हाय हाय’अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

    अकोल्यात शेगावकडे जाणाऱ्या मनसेच्या १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. मनसे जिल्हाप्रमुख राजेश काळेंसह कार्यकर्त्यांना डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनसेच्या डाबकी रोडवरील जिल्हा कार्यालयातून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.