इम्प्रेशन मारण्यासाठी घातली पोलीस वर्दी; खरे पोलीस आले अन्…

मित्र-मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने पोलिसांचा (Pune Crime) गणवेश घातला खरा पण, तो पेट्रोलिंग करणार्‍या चतु:श्रृंगी पोलिसांनाच सापडला अन् त्याच बिंग फुटलं. खऱ्या खुऱ्या पोलिसांनी त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने औंध चौकीत नेमणूकीला असल्याचे सांगितले. मात्र, त्याचा बनाव उघड झाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

    पुणे : मित्र-मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने पोलिसांचा (Pune Crime) गणवेश घातला खरा पण, तो पेट्रोलिंग करणार्‍या चतु:श्रृंगी पोलिसांनाच सापडला अन् त्याच बिंग फुटलं. खऱ्या खुऱ्या पोलिसांनी त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने औंध चौकीत नेमणूकीला असल्याचे सांगितले. मात्र, त्याचा बनाव उघड झाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

    यशवंत रमेश धुरी (वय 30, रा. तापकीरनगर, नडे कॉलनी, काळेवाडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार औंधमधील नागरस रोडवरील राम नदीच्या पुलावर रविवारी दुपारी दीड वाजता घडला. वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे व पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक व त्यांचे सहकारी हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे त्यांना दिसले. तो अनोळखी वाटल्याने पोलिसांनी त्याला नेमणुक कोठे आहे, असे विचारले. त्याने औंध पोलीस चौकीला असल्याचे सांगितले. त्याचा गणवेश पोलिसांचा होता.

    पण, पायात चप्पल होती आणि खाकी ड्रेसच्या खांद्यावर म. पो. व कॅपवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले होते. त्यामुळे तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आले. त्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणत सखोल चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत असल्याचे समजले. त्याने मित्र मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी हा गणवेश घातला असल्याचे सांगितले. पोलीस हवालदार कापरे तपास करीत आहेत.