कागल तालुक्यात राजकीय घडामोडींना आला वेग; वाचा काय आहे राजकीय परिस्थिती…

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये रंगलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात ही या महिन्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार संजय मंडलिक शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झाले.

    मुरगूड : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये रंगलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात ही या महिन्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार संजय मंडलिक शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झाले. त्यापूर्वी राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर, कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे ही मंडळी सुद्धा शिंदे गटात सामील झाली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सत्ता स्थानाच्या संख्या गणितावर काही परिणाम होणार का? याची चर्चा जोरदार रंगत आहे.

    मुरगूड (ता.कागल) येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात काही वक्त्यांनी या विषयावर भाष्य केले. विशेष म्हणजे खासदार मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके आणि राजेखान जमादार या कार्यक्रमात उपस्थित होते. या समारंभात जमादार यांचा उल्लेख खासदार मंडलिक यांच्या निर्णयाच्या पाठीमागे असणारी ‘अदृश्य शक्ती’ असा करण्यात आला. राजे घाटगे गटाच्या नेत्यांनी बदलत्या परिस्थितीचा फायदा घेऊन मुरगूड नगरपालिकेत सत्ता समीकरणात बदल घडवून आणावा, असे आवाहन मंडलिक गटास केले.

    अर्थात आपल्या भाषणात जमादार यांनी आपण संजय मंडलिक यांचा निर्णय याबाबत अंतिम असेल व भविष्यातील घडामोडी कशा वळण घेतील. यावर आत्ताच भाष्य करता येणार नाही, अशी भूमिका मांडली. विशेष म्हणजे या कार्यक्रमास शहरात कार्यरत असणाऱ्या भाजपच्या रणजितसिंह पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची अनुपस्थिती विशेष जाणवली.

    अन्य एका राजकीय घडामोडीत कागल येथील मिळकतदारांना सनद आणि प्रॉपर्टी कार्ड वितरण समारंभात बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षाच्या त्यांच्या सत्ताकाळात कागल शहराच्या विकासासाठी तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागेल तेवढा निधी दिला’ याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले.