देऊळवाडी विकास सेवा संस्थेत सत्तांतर; सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा धुव्वा

आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या देऊळवाडी येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा धुव्वा उडवत विरोधी रवळनाथ आघाडीने सत्ता काबीज केली. सत्ताधारी आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

  आजरा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या देऊळवाडी येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा धुव्वा उडवत विरोधी रवळनाथ आघाडीने सत्ता काबीज केली. सत्ताधारी आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

  या निवडणुकीत विरोधी रवळनाथ आघाडीकडून सर्वसाधारण गटातून शंकर पोतनीस, युवराज पोवार, राजाराम पोतनीस, बंडू सावंत, विठोबा पोतनीस, उत्तम शेटगे, महिला राखीव गटातून रत्नाबाई पोतनीस, सरस्वती पोतनीस, अनुसुचित जाती गटातून अर्जुन कांबळे, इतर मागास गटातून गंगुबाई कानोलकर, भटक्या विमुक्त जाती गटातून बाबू गावडे विजयी झाले.

  सत्ताधारी आघाडीचे सागर कदम हे एकमेव उमेदवार सर्वसाधारण गटातून विजयी झाले. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व सुरेश सावंत, शांताराम सावंत, आप्पा मरगळे, जयराम पाटील यांनी केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील थैल यांनी काम पाहिले.

  सभासद यादीवरून निवडणूक गाजली

  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू पोतनीस, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व केले. विजयानंतर उमेदवार व समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. सहा वर्षापूर्वी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष पोतनीस यांच्याकडून सत्ता हस्तगत करण्यात विरोधी मंडळी यशस्वी झाली होती. मात्र, या निवडणूकीत पोतनीस यांनी शिवसेना तालुका प्रमुख पोवार यांना सोबत घेत निवडणूक जिंकून संस्था ताब्यात घेण्यात यश मिळविले. निवडणुकीपूर्वीच नव्या सभासद यादीवरून संस्था चर्चेत होती. उच्च न्यायालयापर्यंत सभासद पात्र-अपात्रतेचा वाद सुरू होता.

  ८४ जणांचे सभासदत्व अपात्र

  गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्तेत असलेल्या मंडळींनी नव्याने केलेल्या १४२ सभासदांपैकी अल्पवयीन, बिगर खातेदार आणि दुसऱ्या गावाचे ग्रामस्थ असलेल्या ८४ जणांचे सभासदत्व अपात्र करण्यात पोवार-पोतनीस जोडीला यश आले. संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरही या संस्थेच्या निवडणुकीबाबत जोरदार चर्चा तालुक्यात होती. स्थानिक पातळीवरील मंडळींबरोबरच तालुक्यातूनही नेते मंडळी दोन्ही बाजूंनी सक्रीय असल्याने निवडणुकीत मोठी इर्ष्या निर्माण झाली होती.