राजकारण जोमात, सुविधा कोमात; पंढरीत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा माहोल तयार होत असताना नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, वैद्यकीय, सार्वजनिक वाहतूक, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

  पंढरपूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा माहोल तयार होत असताना नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, वैद्यकीय, सार्वजनिक वाहतूक, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय राजवट असल्याने त्यांना जाब विचारणारे कोणी नाही. प्रशासकीय पातळीवर सर्वकाही ‘आलबेल’ असे वातावरण आहे. ज्यांना जाब विचारायचा आहे. ते लोकप्रतिनिधी राजकारणात दंग. रिल्स काढणे, कामांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करणे, वाढदिवस साजरे करणे, पक्षाच्या बैठका, यातच दंग आहेत.

  रस्ते, पाणी, पददिवे, आरोग्य सुविधा व प्राथमिक शिक्षण सुविधा देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय राजवटीत प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. एकतर्फी कारभारामुळे मूलभूत सेवा-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सध्या प्रशासन बदल्यांमध्ये गुंतले आहे. बदल्यांमुळे नाराज झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेधाचा भाग म्हणून सेवा सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम नागरिकांना मानसिक, आर्थिक नुकसानीतून भरावे लागत आहे.

  खराडी, रामबाग परिसर, सांगोला रोड, बेलीचा महादेव याठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत. या सर्व रुग्णालयातील डॉक्टर वेळेत येत नाहीत. औषधांची नेहमी कमतरता असते. आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वाट पाहत रुग्ण बसलेले असतात. यावर कोणाचेच नियंत्रण उरलेले नसल्याने नागरिकांना कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न आहे.

  वाहनांच्या रांगाच्या रांगा

  पंढरपूर शहरातील रस्त्यासह सर्वच अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या असताना ती सोडवण्यासाठी प्रशासनाकडून कोणताही पाठपुरावा होत नाही. दररोज सरगम चौक, सावरकर चौक, अर्बन बँक चौक, छञपती शिवाजी महाराज चौक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौंक अगदी वाघोलीपर्यंत वाहनांच्या रांगाच्या रांगा लागत असून, हे प्रशासनाला दिसत नाही का, असा प्रश्न आहे.

  पाणीपुरवठा विस्कळीत

  पंढरपूर शहरातील उपनगरात सात वर्षे झाली तरी आजही आठ दिवस पाणी येत नाही. इसबाई, नवीन वसाहतीत, नवीन उपनगरात, भागात सतत पाणीपुरवठा विस्कळीत आहे. संपूर्ण शहरातील भागात परिस्थिती फार चांगली आहे, असे नाही. कुठे जलकुंभाचे काम, कुठे गळती, तर कुठे कमी-अधिक दाबाने पुरवठा आहे. यामागे अप्रत्यक्ष पाणी कपात असल्याचा संशय आहे. पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था असताना पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मात्र कुठे मग्न आहेत, तेच कळत नाही. पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही, याच्याशी त्यांना काही देणे-घेणे नाही. माजी होऊन स्वतःला नगरसेवक म्हणणाऱ्यांना यांचे गांभीर्य नाही.

  सार्वजनिक सेवेचा बोजवारा

  गोपाळपूर, सोलापूर, कराड-सातारा रस्त्यावर मोठ्याप्रमाणात बसने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. ईसबावी, वाखरी, गोपाळपूर, भागात दररोज बस बंद पडत असून, प्रवाशांचे हाल होत असताना याकडे कोणीही लक्ष देत नाही.

  ग्राऊड रस्त्यांवर खोदाई

  गेल्या काही दिवसांपासून मेन रस्त्यावर असो की अंतर्गत, रस्त्यावर आजही खोदाई सुरू आहे. महावितरण, मोबाइल कंपन्यांसह इतर कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. जर सतत रस्ता तोडायचाच आहे, तर दुरुस्त करताच कशाला, एमएनजीएल झाले की महावितरण, महावितरण झाले की मोबाइल कंपन्या तर बाराही महिने अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबध जोपासत खोदाई करतात. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्यांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खोदलेले रस्ते दिसत नाहीत का? याचा जाब विचारणारी यंत्रणाच सध्या नाही.

  कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर

  इसबावी, नवीन वसाहत, विस्थापितनगर, शहरातील मुख्य भागात या मुख्य भागात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सतत चौकाचौकामध्ये बसलेले टवाळखोर, सर्रास गुटखा विक्री, रिक्षाचालकांची मुजेरी, महिलांची छेड, हाणामाऱ्या, गाड्यांची तोडफोड, महिलांवर हल्ले, आत्महत्या, फसवणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु विरोधात लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत.

  उद्याने, ड्रेनेजची दुरवस्था

  शहरातील, संतपेठ, उपनगर, विस्थापित नगर, सर्वच भागातील उद्यानांची दयनीय अवस्था, ड्रेनेज तुंबल्याच्या हजारो तक्रारी, कचरा वेळेवर न उचलणे, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, डासांचा उपद्रव, कचरा जाळणे, रस्त्यावरील खड्डे न बुजवणे वासारख्या किरकोळ समस्यादेखील उम्र होताना लोकप्रतिनिधी मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.