संभाजी ब्रिगेडने केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध; दिलं ‘हे’ कारण

'राज्य सरकारचा याबाबतीत अध्यादेशच आहे. या अध्यादेशामुसार कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही पूजाअर्चा करायच्या नाहीत. आपला धर्म, आपल्या धार्मिक विधी, आपल्या धार्मिक परंपरा या आपल्या घरात उंबऱ्याच्या आत असले पाहिजे.' असे संतोष शिंदे म्हणाले.

  पुणे : आपल्या मंत्रालयातील दालनात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पूजा (Pooja) केली. या कृतीचा संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) तीव्र शब्दात निषेध केला आहे.

  राज्य सरकार (Maharashtra Government) हे धर्मनिरपेक्ष आहे. असे असताना ही पूजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय राज्यघटनेचा तर अवमान केलेलाच आहे, पण राज्य सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाचाही अवमान केला आहे (Chief Minister Eknath Shinde has not only insulted the Indian Constitution but also the ordinance issued by the state government in this regard.), असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

  राज्य सरकार हे धर्मनिरपेक्ष असते. जर प्रत्येकजण आपापल्या धर्माच्या धार्मिक विधी करायला लागल्या, तर मग याचा अर्थ आपण राज्यघटनेचा अवमान करत आहोत, असे मत निषेध करताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

  ‘राज्य सरकारचा याबाबतीत अध्यादेशच आहे. या अध्यादेशामुसार कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही पूजाअर्चा करायच्या नाहीत. आपला धर्म, आपल्या धार्मिक विधी, आपल्या धार्मिक परंपरा या आपल्या घरात उंबऱ्याच्या आत असले पाहिजे.’ असे संतोष शिंदे म्हणाले.

  मुख्यमंत्रीपदावर येणारे हे बंडखोर असतील, व्यभिचारी असतील, राजकीयदृष्ट्या त्यांनी गद्दारी केलेली असेल, प्रतारणा करणारे लोक आपले पाप धुण्यासाठी जर विधिवत पूजा करणार असतील, तर हा त्या धर्माचाही अनादर आहे, असेही शिंदे यांनी पुढे म्हटले आहे.

  ते पुढे म्हणतात, खरेतर ज्यांची नियत साफ नाही, ज्यांची नीतीमत्ता साफ नाही, ज्यांना भिती वाटते, असे लोक पूजा-अर्जा करतात. देवदेव करतात. का?, तर त्यांनी पाप केलेले असते म्हणून. मोठ्या मनाने, साफ मनाने तुम्ही राज्यकारभार करा. लोकांचे प्रश्न सोडवा, लोकांच्या अडीअडचणींमध्ये मदत करा. ज्या फायली रखडलेल्या आहेत, ती कामे करा. इथे पूजाअर्चेचा काय संबंध आहे? हा भारतीय राज्यघटनेचा तर अवमान आहेच, पण सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा देखील अवमान आहे. तुम्ही धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचा अवमान करणार नाही, त्याच प्रमाणे माझ्याही धर्माचे स्तोम माजवणार नाही, उन्माद करणार नाही, अशी शपथ घेऊन तुम्ही सत्तेवर आला आहात.

  मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही- संभाजी ब्रिगेड

  मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पूजाअर्चा केल्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. पूजाअर्चा ही निषेधार्ह गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही. धर्मनिरपेक्षता आपण जोपासली पाहिजे आणि आपल्या धर्माचे स्तोम आपण जगजाहीर करण्याची गरज नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात झालेल्या या कृतीचा मी तीव्र आणि कडवट शब्दात निषेध करतो, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी शेवटी म्हटलेले आहे.