हे चाललयं तरी काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जेवणात पुन्हा सापडली अळी

आता पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळून आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक होत सचिव आणि प्रकुलगुरू यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

    पुणेः मागील काही महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरी येथील निकृष्ठ दर्जाचे जेवण हा चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ असून याबाबत अनेक आंदोलने व निषेध व्यक्त केले जात आहेत. मात्र तरी देखील हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळून आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक होत सचिव आणि प्रकुलगुरू यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. येथील जेवण निकृष्ट दर्जाचे असून त्यात वारंवार कीटक, अळी, प्लास्टिकचे तुकडे निघत असून या प्रकाराने विद्यापीठातील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
    दोन-तीन दिवसांपूर्वी आम्ही मेस चालकाविरोधात कारवाई करत पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र आता पुन्हा एकदा मंगळवारी दुपारी विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये जेवणाच्या ताटामध्ये आळी सापडल्याची तक्रार करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. येथील राज्यशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी सिद्धांत जांभुळकर म्हणाला, ‘आम्ही दुपारच्या जेवणासाठी रेफ्रेक्टरीमध्ये गेलो होतो. भाजी चांगली नव्हती म्हणून मी भात आणि मसूर खाण्यासाठी घेतले. माझ्या जेवणात अळी निघाली. ही काही पहिलीच वेळ नाही. असा निष्काळजीपणा आणि चूक सातत्याने घडत आहे. विद्यापीठ अधिकाऱ्यांनी मेस कमिटी बनवली परंतु ते चौकशीला कधीच आले नाही. कॅन्टीनच्या बाहेर लावलेल्या मेस कमिटीच्या पोस्टरमध्ये मोबाईल क्रमांकाचा उल्लेख नाही. समितीचे कर्मचारी क्रमांक नमूद केल्यास विद्यार्थ्यांना तक्रारी करणे सोपे जाईल.’
    सिद्धांत म्हणाला “विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या निविदांमध्ये रस नाही, आम्हाला फक्त चांगले आणि आरोग्यदायी अन्न हवे आहे, दुसरे काही नाही.तर राहुल ससाणे संशोधक विद्यार्थी म्हणाला की,’मेसमधील घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही विद्यापीठ प्रशासनाला भेटलो. त्यांनी मेस चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थांना खाण्यायोग्य पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे.’ अशी मागणी केली जात आहे. आता विद्यार्थ्यांच्या तक्रारीबाबत माहिती घेऊन त्यावर योग्य कार्यवाही केली जाईल असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव विजय खरे यांनी व्यक्त केला आहे.