दुपारी उकाडा अन् सायंकाळनंतर दिलासा; वातावरणात अचानक बदल झाल्याने वादळासह पावसाची शक्यता

मे महिन्यात उन्हाची सवय असलेल्या नागपूरकरांना (Nagpur Rain) रविवारी सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला. दुपारपर्यंत दमट वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असल्याने नागपूरकर त्रस्त झाले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात ढग दाटून आले.

    नागपूर : मे महिन्यात उन्हाची सवय असलेल्या नागपूरकरांना (Nagpur Rain) रविवारी सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला. दुपारपर्यंत दमट वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असल्याने नागपूरकर त्रस्त झाले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात ढग दाटून आले. गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमानही 40 अंशा खाली असून, रविवारी नागपुरात 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

    हवामान विभागाने पुढील 16 मेपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. परंतु काही वेळातच उन्ह पडण्यास सुरुवात झाले. त्यामुळे दमट वातावरण तयार होऊन बाहेर फिरणाऱ्या दुचाकीधारकांच्या अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या; परंतु सायंकाळी चारच्या सुमारास आकाशात पुन्हा ढग जमा झाले.

    काही भागात पावसाच्या सरी आल्याने वातावरणही गार झाले. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला. गार वातावरणाचा लाभ घेत अनेकजण कुटुबीयांसह फुटाळा, अंबाझरी तलाव परिसरात फिरण्यास निघाले. विशेषतः तरुण, तरुणींनी या तलाव परिसरात चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले.

    दरम्यान, तापमानात रविवारी चांगलीच घट दिसून आले. शहरात 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सरासरीपेक्षा 4.8 अंशाने कमी होते. किमान तापमान 25.2 अंश नोंदविण्यात आले. हवामान विभागाने पुढील 16 मेपर्यंत वादळासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. 17 व 18 मे रोजी उन्ह-सावली राहण्याची शक्यता असून, तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.