पुणे परिसरात गारठा वाढण्याची शक्यता; किमान तापमानात पुन्हा हळूहळू घट

पुणे शहरातील किमान तापमानात आता पुन्हा हळूहळू घट होत असून, गारठा काहीसा वाढण्याची शक्यता आहे. शहर व परिसरात मुख्यतः निरभ्र वातावरण आणि पहाटे धुके पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

    पुणे : पुणे शहरातील किमान तापमानात आता पुन्हा हळूहळू घट होत असून, गारठा काहीसा वाढण्याची शक्यता आहे. शहर व परिसरात मुख्यतः निरभ्र वातावरण आणि पहाटे धुके पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

    साधारणपणे २० अंशांच्या घरात पोचलेल्या किमान तापमानात मागील तीन ते चार दिवसांपासून घट होताना दिसून येत आहे. किमान तापमानात झालेली वाढ यामुळे उकाडाही काहीसा जाणवत होता. त्यात पावसाने देखील शुक्रवारी (ता. १०) हजेरी लावत उकाड्यापासून काहीशी सुटका केली. रविवारी (ता. १२) शहरात १७.७ अंश सेल्सिअस किमान आणि ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात तीन अंशांनी वाढ कायम होती. दरम्यान, आता थंडीत काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे.

    पावसासाठी पोषक वातावरण झाल्याने राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यातच आता ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निवळण्याचा अंदाज असून राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्राच्या भागातील किमान तापमान कमी होत थंडी वाढू शकते.