राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका लाखो विद्यार्थ्यांना, संपावर तोडगा निघणार?

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाच्या योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

  मुंबई : राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी (non-teaching staff) परीक्षेसंदर्भातील (Examinition) कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे मुंबई विद्यापीठासह (Mumbai university) राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पुढील परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासून (३ फेब्रुवारी) होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल. असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

  परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार

  दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. विद्यापीठात सध्या इंजिनीअरिंग, एमकॉम आणि एलएलबीच्या परीक्षा सुरू असून या परीक्षांशी संबंधित कोणतेही काम न करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने घेतला आहे. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीकडून गुरुवारी २ फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला.

  काय आहेत मागण्या?

  सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाच्या योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरूवारी दुपारी १२ च्या कामकाजावर बहिष्कार टाकला, त्यापूर्वी सकाळी ८ ते ९ दरम्यान परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचल्यामुळे बुधवारी परीक्षेवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कामकाज सुरु करणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याचा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

  राज्यातील परीक्षांवर परिणाम…

  महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केल्याने पुढील आदेशापर्यंत परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठातील परीक्षा पद्धतीवर मोठा परिणाम होतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात BA, BSC, BBA, LAW काही विभागाच्या सुरु आहेत किंवा काही विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत.