
जालना(Jalna) शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं दिसत आहे. तसेच अंबड चौफुलीपासून ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंत रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
जालना: जालन्यामध्ये (Jalna) एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. इथे खड्डेमय (Potholes) रस्त्याचं नामकरण करण्याबरोबरच खड्डे मोजण्याच्या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही खड्डे मोजण्याची स्पर्धा (Potholes Counting Competition) आयोजित करण्यात आली होती. जालना शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं दिसत आहे. तसेच अंबड चौफुलीपासून ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंत रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याबाबत पालिकेला अनेक निवेदनं देण्यात आली आहेत. मात्र हा रस्ता कित्येक वर्षांपासून तसाच आहे. यामुळे आज प्रशासनाला जागं करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं अंबड चौफुली रस्त्यावरील खड्डे मोजण्याचीच स्पर्धा ठेवत रस्त्यावरील खड्डयांचं बारसं करत रस्त्याचं नामकरण केलं.
खरंतर या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य नागरिक यांना जावेच लागते. कारण हा रस्ता पुढे पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन विश्रामगृह, तहसील यांना जोडलेला आहे .तसेच तो पुढे बीड- सोलापूरकडेही जातो .त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडलेले आहेत. वारंवार पालिकेला निवेदन देऊनही हे खड्डे न बुजवल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली.
खड्डे मोजण्याची स्पर्धा यावेळी घेण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पाळणा गाऊन या खड्ड्यांचे नामकरण केले आणि मोजणीही केली. मोजणीनंतर बक्षीसांचे वाटप करण्यात आले. जास्तीत जास्त खड्डे मोजणाऱ्याला प्रथम क्रमांकाचे 1001 रुपयांचे बक्षीसही यावेळी देण्यात आले.
शहरात जुन्या जालन्यातील नूतन वसाहत आणि नवीन जालन्यातील बडी सडक हे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत. दरम्यान या दोन्ही रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यांचे नूतनीकरण तर सोडाच हे खड्डे बुजवण्याचा त्रासही नगरपालिका घेत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. जर खड्डे बुजवले तर त्यामध्ये माती मिश्रित मुरूम टाकले जाते. त्यामुळे खड्ड्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना आणखीनच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.