
बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांना दैनिक नवभारत ग्रुपच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार जाहीर झाला असून, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांना दैनिक नवभारत ग्रुपच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार जाहीर झाला असून, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव यांना कोरोना योध्दा पुरस्कार जाहीर झाला आहे. दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या वतीने सोमवार दिनांक २८ मार्च रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृह याठिकाणी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्तबगार मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान सभेच्या उपसभापती आ. नीलम गोऱ्हे, भाजप नेते प्रवीण दरेकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी मान्यवरांच्या प्रमूख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केले आहे. गेली पाच वर्षापासून त्या बारामतीच्या नगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत. बारामतीचा नावलौकिक जपण्यासाठी या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून बारामतीमध्ये नाट्य संस्कृती जपण्याचे काम केले आहे.
अखिल भारतीय नाट्यपरषदेचे दोनवेळा त्यांच्या पुढाकाराने यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या नाट्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाचे भरभरून कौतुक राज्यातील दिग्गज मराठी अभिनेत्यांनी केले होते. आपल्या उत्कृष्ट कामकाजामुळे किरण गुजर यांची राज्यभर ओळख आहे. कोरोना काळामध्ये बारामती शहरात कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक झाले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनीदेखील कोरोना काळामध्ये नटराज नाट्य कला मंडळाच्या कोवीड सेंटरच्या माध्यमातून सक्रिय राहून रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम केले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव यांनी कोरोनामध्ये आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी राबवलेला अन्नदानाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या सर्व बाबींचा विचार करून वरील मान्यवरांना सोमवारी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुणे व सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील इतरही दिग्गजांचा सन्मान या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे.