भाजपबरोबर सत्तेबाबत तीन वेळा निर्णय झाला होता; सुनील तटकरे यांचा पुनरुच्चार

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकारी रुपाली चाकणकर यांनी भावनेच्या भरात चूक केली आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परीषदेत नमूद केले. तसेच भाजपबराेबर सत्तेत सहभागी हाेण्याचा यापूर्वी तीन वेळा निर्णय झाला हाेता, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

  पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकारी रुपाली चाकणकर यांनी भावनेच्या भरात चूक केली आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परीषदेत नमूद केले. तसेच भाजपबराेबर सत्तेत सहभागी हाेण्याचा यापूर्वी तीन वेळा निर्णय झाला हाेता, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

  पुणे शहर लाेकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ यांच्या प्रचारार्थ आयाेजित पत्रकार परीषदेत तटकरे यांनी भुमिका स्पष्ट केली. यावेळी शहराध्यक्ष दिपक मानकर, प्रदीप देशमुख, संजय मयेकर, हेमंत लेले आदी उपस्थित हाेते.

  खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर चाकणकर यांनी मतपेटीची पूजा केली हाेती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बारामती लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पैशांचे वाटप झाले, आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवीगाळ केल्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तटकरे म्हणाले, ‘ कधी कधी भावनेच्या भरात चूक हाेत असते, चाकणकर यांच्या हातून चूक झाली आहे. नियमानुसार काय ती पुढील कारवाई हाेईल. पैसे वाटप करण्याचा आराेप, तक्रारी करणे म्हणजे त्यांना पराभव दिसू लागला आहे.’

  राज्यात आजपर्यंत झालेल्या तीन टप्प्यातील मतदानात मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना दिलेल्या प्रतिसादावरून ते विजयी हाेतील असा विश्वास व्यक्त करीत तटकरे म्हणाले की, ‘या निवडणुकीच्या निमित्ताने संविधान, लाेकशाही धाेक्यात आणली जात असल्याचा आराेप विराेधकांकडून केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यावरून टीका केली जात आहे. हे दाेन्ही मुद्दे उपस्थित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. वास्तविक भाजपबराेबर राज्यात सरकार स्थापन करण्याचा निर्णय २०१४, २०१६ अािण २०१९ मध्ये असा तीन वेळा झाला आहे.

  प्रत्येक वेळी पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला. २०१४ आणि २०१६ मध्ये शिवसेना भाजपबराेबर सत्तेत असेल असे भाजपचे नेते अमित शहा यांनी स्पष्ट केले हाेते. शिवसेना आमचा जुना मित्र पक्ष असल्याने आम्ही त्यांच्याबराेबरची युती ताेडणार नाही, असे शहा यांनी नमूद केले हाेते. तसेच २०१९ मध्ये पक्षाच्या सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांनी सह्या करून भाजपबराेबर जाण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यावेळी चर्चाही झाली हाेती. यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून अन्य कारणांसाठी बाहेर पडलाे या चर्चेत अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  राहुल गांधी अपरीपक्व

  पंतप्रधान नरेंद्र माेदी हे पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाची राज्यघटना बदलली जाईल असे आरोप करणारे काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपरीपक्व नेतृत्व आहे. ३७० कलम, सीएए कायदा आदीविषयी अल्पसंख्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, पण ताे आम्ही दूर करीत आहाेत असेही तटकरे यांनी नमूद केले.