Prabodhan to go home after her husband's death! The need for actual implementation, the decision on women and child development

ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा ठराव केला व त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली. याची राज्यभर दखल घेतली असून, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या हेरवाड पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार आता महिला बाल विकास विभागानेही पुढाकार घेतला आहे.

    शिरपूर : विधवा प्रथा मोडण्याचा नुसता ठराव करून न थांबता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, यासाठी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात कोणत्याही कुटुंबातील पुरुष यांचे निधन झाल्यावर गाव किंवा शहर पातळीवरील पथक तेथे जाऊन या अनिष्ट प्रथेबाबत कुटुंबीयांचे प्रबोधन करणार आहे. या कुटुंबियांची भेट घेऊन अगोदर सांत्वन करणे व विधवा प्रथेला मूठमाती देणे, बाबत त्यांचे मतपरिवर्तन करण्यात येणार आहे.

    हेरवाड (ता. शिरोळ व ढोरखेडा ता. मालेगाव) ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा ठराव केला व त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली. याची राज्यभर दखल घेतली असून, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या हेरवाड पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार आता महिला बाल विकास विभागानेही पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या काळात ज्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले त्यातील एकल किंवा विधवा महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांमध्ये सध्या मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे.

    या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गाव, शहर पातळीवर पथके स्थापन केली आहेत, या पथकांमध्ये ग्रामसेवक, तलाठी ,प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. विधवा प्रथेबाबत त्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन प्रबोधन करणार व त्यांना या प्रथा पाळू नका, असे आवाहान करणार, विधवा म्हणून दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे त्या महिलेच्या मनावर किती आघात होतो, याची जाणीव करून देणार, तिचा दोष नसतानाही सामाजिक ,धार्मिक कार्यात सहभागी होण्यास मनाई केली जाऊ नये, यासाठी कुटुंबाचे संवादकरण करणे आदी कार्य पथकामार्फत केले जाणार आहेत.

    या प्रथेला घातला जाणार आळा
    पतीच्या निधनामुळे पत्नीचे कुंकू पुसणे, पार्थिवाच्या तोंडात सोन्याचा मणी घालण्यासाठी मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, जोडवे काढणे शुभकार्यापासून विधवा म्हणून वंचित ठेवणे, वैधव्य आल्यानंतर हिरवी साडी नेसण्यास किंवा साज श्रुंगार करण्यास विरोध करणे, या प्रथेला आळा घातला जाणार आहे.