प्रकाश आंबेडकरांचे छगन भुजबळ यांना खास आमंत्रण; ठाकरेंना विचारला सवाल

राष्ट्रवादी (शरद पवार गट) व वंचित बहुजन आघाडीमधील कोणत्याही नेत्याचा समावेश नव्हता. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छगन भुजबळ यांना देखील राजकीय सल्ला दिला आहे.

    मुंबई : आगामी निवडणूकांमुळे (Loksabha Election) राजकीय वर्तुळामध्ये बैठकांना व चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीसह (MVA) महायुती देखील लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या कामाला लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटप फॉर्मुला ठरवला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला (Ramesh Chennithala) यांची भेट झाल्याचे समोर येत आहे. या बैठकीवेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) व वंचित बहुजन आघाडीमधील (VBA) कोणत्याही नेत्याचा समावेश नव्हता. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांना देखील राजकीय सल्ला दिला आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांची पुढची राजकीय वाटचाल नक्की कोणासोबत असणार आहे याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझौता केलेला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना या बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं ? असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसने 24 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 23 जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून, ही बाब खरी आहे का?”, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने या व्हिडिओतून मांडली आहे.

    प्रकाश आंबेडकर छगन भुजबळांबाबत नेमकं काय म्हणाले?

    “ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलीय. या घोषणेच्या आधी त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ यांना माझा सल्ला आहे की, आपण या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक, राजकीय दृष्टीने त्यांना पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील, अशी आशा आम्ही बाळगतो”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. यामुळे ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे.