प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’चा अखेर महाआघाडीत झाला समावेश; जागावाटपावरही सहमती?

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत सामावून घेण्यात आले आहे. तसे पत्रच प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

  मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत सामावून घेण्यात आले आहे. तसे पत्रच प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. त्यावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  महाविकास आघाडीच्या या बैठकीस प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने त्यांचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. वंचितला घटकपक्ष म्हणून घेतले असल्याचे लेखी स्वरूपात देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर आघाडीकडून एक पत्रक काढून ही माहिती देण्यात आली. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी युती केली होती. मतविभाजन झाल्यावर काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नांदेड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणदेखील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.

  सर्व 48 जागा लढविण्याची धमकी

  महाविकास आघाडीत घेतले जात नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर उमेदवार उभे करण्याची धमकी दिली होती. निर्णयाला विलंब होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला होता. तथापि, आमच्याप्रमाणेच आंबेडकर हेदेखील हुकूमशाही राजवटीच्या विरोधात लोकशाही आणि घटना वाचविण्यासाठी लढा देत आहेत, असे सांगत महाआघाडीतील घटकपक्षांनी, वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आल्याने विरोधकांचे बळ वाढणार असल्याचा दावा केला आहे.

  ‘वंचित’ला सोबत घेण्यामागचे गणित

  मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएसोबत युती केलेली होती. यात औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलिल विजयी झाले होते, तर अकोल्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. सांगलीत वंचितच्या गोपीचंद पडळकरांना अडीच लाखांवर मते होती. नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या मतदारसंघांत काँग्रेस तिसन्या स्थानी फेकली गेली होती. या जागांवर आघाडीचा उमेदवार जेवढ्या मतांनी पराभूत झाला त्याहून अधिक मते वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती.