नास्तिकतेची शेखी मिरवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईचा कळवळा येणे हा असली ढोंगीपणा, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

महाराष्ट्राचा सर्वेसर्वा म्हणून देशात प्रतिमा होती ती येणाऱ्या काळात संपुष्टात येईल की काय अशा भीतीने त्यांना ग्रासले असल्याचेही दरेकर म्हणाले.

    मुंबई : अयोध्येत सीतेची मूर्ती का नाही अशी तक्रार माझ्याकडे महिलांनी केल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी नास्तिक असल्याची शेखी अनेकदा मिरवली आहे. राम मंदिरात बाल रूपातील रामलल्ला विराजमान झालेत हे बघायला पवारांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. जे स्वतःच्या सुनेला बाहेरील आलेली म्हणून हिणवतात, त्यांना सीतामाईचा कळवळा येणे हा असली ढोंगीपणा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे प्रत्युत्तर दरेकर यांनी दिले आहे.

    पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही अशा प्रकारचा जावई शोध शरद पवारांनी नुकताच लावला आहे. एरव्ही पवार हे मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत असताना नास्तिक असल्याची शेखी मिरवतात. शरद पवार यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला हे करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर अशा प्रकारचे वक्तव्य केले नसते. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान झालेत हे बघायला पवारांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे काम शरद पवार हतबल झाल्यासारखे करताना दिसताहेत. जे स्वतःच्या सुनेला बाहेरील आलेली म्हणून हिणवतात, त्यामुळे सीतामाईचा कळवळा येणे हा पवारांचा असली ढोंगीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. प्रभू श्रीरामाचा जयघोष करत जेव्हा जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाच्या मागे उभी राहते तेव्हा शरद पवार हताश झाले, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

    तसेच शरद पवार यांनी ५० वर्षाचे संसदिय राजकारण केले. लबाडीचे, ढोंगीपणाचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करूनच राजकारणात सत्तेच्या पोळ्या भाजल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहिताचे राजकारण केले आहे. गरीबाच्या कल्याणाचे राजकारण केले. संविधान दिन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला. ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली आहे त्याला पंचतीर्थाचा दर्जा आम्ही दिला. परदेशातील बाबासाहेबांचे निवासस्थान विकत घेऊन त्याचे स्मारकात रूपांतर केले. इंदू मिलच्या जागेत गतीने स्मारक उभे राहतेय. ज्या काँग्रेसने निवडणुकीत मुंबई, भंडाऱ्यात बाबासाहेबांचा पराभव केला त्या पवारांना संविधान, बाबासाहेबांवर कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शरद पवार हे हतबल झाले आहेत. बारामतीत पराभव होतोय. महाराष्ट्राचा सर्वेसर्वा म्हणून देशात प्रतिमा होती ती येणाऱ्या काळात संपुष्टात येईल की काय अशा भीतीने त्यांना ग्रासले असल्याचेही दरेकर म्हणाले.

    संजय राऊत यांनी भाजपा नेते नारायण राणे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत दरेकर म्हणाले की, नारायण राणे पक्षात असताना हवे असल्याचे कधी वाटत नव्हते. आता त्यांना हवे वाटताहेत. भाजपाचे उमेदवार नारायण राणे आहेत कोकणात चारआणे पण उबाठा गटाला शिल्लक ठेवणार नाहीत. एवढा जनाधार नारायण राणे, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराची हवा कोकणात आली आहे. अडीच ते तीन लाखांच्या फरकाने नारायण राणे निवडून येतील. उरलासुरलेला उबाठा पक्ष संपविण्याची संजय राऊत यांनी शपथ घेतलीय ती पूर्ण करण्याचे त्यांचे काम सुरू असल्याची कोपरखळीही दरेकरांनी लगावली.

    विनायक राऊत यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, विनायक राऊत यांनी १० वर्षात कोकणातील जनतेसाठी काय केले याचा हिशोब कोकणच्या जनतेला द्यावा. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचे सरकार होते. मातोश्रीतून सरकार बाहेर गेले नाही, अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात एक-दोन वेळा आले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा, लोकसभा क्षेत्रात विकासनिधी किती गेला, विकासकामे किती झाली आणि विनायक राऊत खासदार असताना आपल्या लोकसभा क्षेत्रात केंद्राच्या माध्यमातून कुठले प्रकल्प आणले, कुठला विकासनिधी आणला. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी काय दिलात याचा हिशोब त्यांनी द्यावा. ही फक्त बोलबच्चन करणारी लोकं आहेत. बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे कोकणात आतापर्यंत यांचे चालले. आता बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे घेऊन चाललेत. हिंदुत्ववादी जनता भाजपा, शिवसेना आणि महायुतीसोबत आहे, असेही दरेकर म्हणाले.