डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांच्यावर कारवाई होणारच; पीआरसी कमिटी ठाम, आरोपांची चौकशी होणार

दलित वस्ती विकास निधी वाटपात टक्केवारी घेतल्याचा आरोप झालेल्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील (Dy CEO Chanchal Patil) यांच्यावर चौकशी करुन कारवाई केली जाणार असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष संजय रायमुलकर व सदस्य विक्रम काळे (Vikram Kale) यांनी दिली.

  सोलापूर : दलित वस्ती विकास निधी वाटपात टक्केवारी घेतल्याचा आरोप झालेल्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील (Dy CEO Chanchal Patil) यांच्यावर चौकशी करुन कारवाई केली जाणार असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष संजय रायमुलकर व सदस्य विक्रम काळे (Vikram Kale) यांनी दिली.

  जिल्हा परिषदेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी पंचायतराज समिती तीन दिवसांच्या दौऱ्यावर आली होती. अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्यासह 19 आमदारांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराची चौकशी केली. यामध्ये अनिल पाटील, डॉ. देवराव होळी, सदाभाऊ खोत, किशोर दराडे, प्रदीप जैस्वाल, कैलास पाटील, विजय रहांगडाले, माधवराव पवार, अमरनाथ राजूरकर, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, विक्रम काळे, अंबादास दानवे, महादेव जानकर, मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे, शेखर निकम, कृष्णा गजबे यांचा समावेश आहे. या समितीने विविध योजनांच्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विभागप्रमुख यांची साक्ष घेण्यात आली.

  त्यानंतर समितीने खर्चाचा आढावा घेतला व जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. अकरा तालुक्‍यांच्या भेटीसाठी चार पथके तयार करण्यात आली होती. विविध योजना व खर्चाचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी समितीचे अध्यक्ष रायमुलकर यांनी सदस्यांसह पत्रकार परिषद घेतली.

  समितीकडे विविध प्रकारच्या सुमारे 40 तक्रारी करण्यात आल्याचे अध्यक्ष रायमुलकर यांनी सांगितले. त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याविरुद्धची तक्रार अत्यंत गंभीर असून चौकशीसाठी सचिवांकडे साक्ष लावण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  चंचल पाटील यांनी दलित वस्ती विकास निधी वाटप करताना टक्केवारी घेतल्याचा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला होता. तसेच यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही असा आरोप झाला होता. या आरोपांची चौकशी करून पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे रायमुलकर यांनी स्पष्ट केले.

  तसेच ग्रामपंचायत विभागाचा पदभार असताना ग्रामसेवक यांच्या नियुक्त्या व कारवाई टाळल्याबाबतही तक्रारी आल्या आहेत. समितीने घेतलेल्या आढाव्यातील बऱ्याच बाबी गोपनीय आहेत. त्या पत्रकार परिषदेत सांगता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  पैसे गोळा केल्याची तक्रार

  पंचायतराज समितीच्या दौऱ्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यात आल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. सदस्य विक्रम काळे यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेत ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. समितीच्या चौकशीत विविध विभागातील अधिकारी व कामाबाबत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अशा संबंधित अधिकाऱ्यांची सचिवांकडे साक्ष लावण्यात आली आहे. कोरोना काळात सीईओ स्वामी यांनी राबवलेल्या माझे गाव कोरोनामुक्त या उपक्रमाचे समितीने कौतुक केले.