जंजिरे वसई किल्ल्यात प्रि-वेडिंग शूटिंग बंद! अश्लील छायाचित्रणास लागणार लगाम

कोणतीही परवानगी न घेता, ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यात राजरोसपणे प्रि-वेडिंगच्या नावाखाली अर्ध नग्नावस्थेत शूटिंग केली जात होती.

    वसई : जंजिरे वसई किल्ल्यात प्रि-वेडिंग शूटिंग आणि छायाचित्रणास बंदी घालण्यात आल्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्याची विटंबना आता थांबणार आहे. तसा सातत्याने पाठपुरावा किल्ले वसई मोहीमेने केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे.

    कोणतीही परवानगी न घेता, ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यात राजरोसपणे प्रि-वेडिंगच्या नावाखाली अर्ध नग्नावस्थेत शूटिंग केली जात होती. त्याखाली ऐतिहासिक शिलालेख बुटांखाली चिरडण्यात येत होते. हा किल्ला सर करण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपले बलिदान दिले आहेत. त्यांच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या या किल्ल्याची विटंबना केली जात असल्यामुळे किल्ले वसई मोहिमेच्या प्रतिनिधींनी पत्रव्यवहार, माहिती अधिकार, पाठपुरावा, ई-मेल आंदोलने केली होती.

    किल्ल्यात ३१ डिसेंबरची रात्र मद्यधुंद होऊन साजरी केली जात असल्यामुळेही किल्ले प्रेमींनी नाराजी व्यक्त करुन रात्रभर पहारा दिला होता. गेली अनेक वर्षे सत्याची दिशा ठामपणे बजावत दुर्गमित्रांना अखेर यश आले असून, अनेक गडकोटांवर सुरू असणारे अश्लील प्रि-वेडिंग आणि इतर बेशिस्त छायाचित्रणास यानिमित्ताने लगाम बसणार आहे. किल्ले वसई मोहिमेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश प्राप्त झाले अशी प्रतिक्रिया विविध माध्यमातून व्यक्त होत आहे.

    पुरातत्व विभागाच्या सायन मुंबई कार्यालयाने जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकात कोणत्याही प्रकारचे प्रि-वेडिंग, छायाचित्रण वसई किल्ल्यावर पूर्णपणे बंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर पत्रक वसई, पुणे, कोल्हापूर, विजयदुर्ग, रायगड इत्यादी ठिकाणी देण्यात आले असूनही वसई किल्ल्यावर नियमावलीत हे पत्रक लावण्यात आले नव्हते. ही बाब किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी सागर पाटील, निखिल हडळ, प्रीतम पाटील, श्रीदत्त राऊत यांनी निदर्शनास आणली होती. तसेच जंजिरे वसई किल्ल्यावर पुरातत्व विभाग सोईची नियमावली आणि आर्थिक गणिते पूर्ण करण्यात धन्यता मानत किल्ल्याचा बळी देणार का? असा सवाल ही करुन दुर्गमित्रांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

    पुरातत्व विभाग अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पत्रकास वसई विभाग मंडल विभाग अंतर्गत केराची टोपली दाखवण्यात आल्याचे वृत्तही सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. या विषयाची योग्य दखल घेत केंद्रीय पुरातत्व विभाग वसई अंतर्गत प्रि-वेडिंग शूटिंग बंदीबाबत स्पष्ट फलक वसई किल्ल्यावर लावण्यात आले आहेत. स्पष्ट नियमावली फलकामुळे किल्ल्यावरील बेताल बेशिस्त छायाचित्रण बंद होणार आहे. किल्ले वसई मोहीम परिवार आणि समस्त दुर्गमित्रांनी सातत्याने केलेल्या आंदोलनाचे हे यश आहे. तर दुर्गमित्रांनी केंद्रीय पुरातत्व विभाग वसई आणि सायन मुंबई यांच्या मुख्य अधिकारी, कार्यकारी वर्गाचे सकारात्मक निर्णयाबद्दल अभिनंदन केले आहे.