मनसेला भोंग्याचा फायदा पालिकेत होईल, त्यांना पालिका निवडणुकीत चांगले यश मिळेल, प्रकाश आंबेडकरांचं भाकित

भोंग्यांचा विषय मनसेनं घेतल्यामुळं त्यांना त्याचा पालिका निवडणुकीत फायदा होईल असं भाकित प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. भोंग्याचा राजकीय फायदा राज ठाकरेंना होईल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भोंगे वादात जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो राज ठाकरेंचा झाला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेचा शिवसेनेसह भाजपालाही धक्का लागल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : सध्या राज्यात राजकारणात भोंगे, अजान, मशिद, हनुमान चालीस, आरती यावरुन बरेच राजकारण रंगताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवाच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या होणाऱ्या त्रासाबदद्ल प्रकाश टाकत जर न्यायालयाने भोंगे हटविण्याचे आदेश दिले आहेत, तरीसुद्धा भोंग कसे काय सुरु आहेत? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी जर भोंगे उतरविले जात नसतील तर, मशिदीसमोर हनुमान चालीस म्हणा असं आवाहन केले होते. त्यानंतर त्याचे पडसाद सर्वंत्र देशभरात पाहयला मिळत आहेत.

    दरम्यान, यूपीत मशिदीवरील भोंगे उतरविण्यात आलेत. तर राज्यात अनेक ठिकाणी भोंगे उतरविण्यात आले असून, भोंग्याच आवाज सुद्धा कमी झाला आहे. या सर्व घडामोंडीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहेत. राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं सत्ताधारी शिवसेनेची अडचण वाढली आहे. त्यात राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केला असून येत्या ५ जूनला ते अयोध्येत जाणार आहेत. त्याठिकाणी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांना कडाडून विरोध केला आहे. हा भाग वेगळा असला तरी, सध्या मनसेची जोरदार चर्चा आहे. याचा त्यांना पालिका निवडणुकीत फायदा होईल असं राजकीय विश्लेषकांसह अनेकांना वाटत आहे.

    आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक भाकीत केलं आहे. भोंग्यांचा विषय मनसेनं घेतल्यामुळं त्यांना त्याचा पालिका निवडणुकीत फायदा होईल असं भाकित प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. भोंग्याचा राजकीय फायदा राज ठाकरेंना होईल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भोंगे वादात जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो राज ठाकरेंचा झाला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेचा शिवसेनेसह भाजपालाही धक्का लागल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आगामी काळात याचा कुणाला फायदा व कुणाला तोटा होतोय हे येणारा काळच ठरवेल.