रेडिमेड फराळाला पसंती; घरगुती, केटरींग व्यावसायीकांना रोजगाराची आयती संधी

तयार फराळ खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. नाेकरी, विभक्त कुटुंब आदी कारणांमुळे आवश्यक तेवढाच तयार फराळ घेणेच पसंत केले जात आहे. यामुळे घरगुती, केटरींग व्यावसायीकांना राेजगाराची संधी मिळाली आहे.

  पुणे : तयार फराळ खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. नाेकरी, विभक्त कुटुंब आदी कारणांमुळे आवश्यक तेवढाच तयार फराळ घेणेच पसंत केले जात आहे. यामुळे घरगुती, केटरींग व्यावसायीकांना राेजगाराची संधी मिळाली आहे.

  दिवाळीचा गाेडवा वाढविणारे फराळाचे पदार्थ तयार करण्याचे प्रमाण विविध कारणांमुळे कमी हाेत आहे. फराळाचे पदार्थ केले तर ते मर्यादीत प्रमाणातच करण्यावर भर दिला जात आहे. नाेकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे, यामुळे नाेकरी सांभाळून फराळ तयार करण्यासाठी त्यांना वेळ देणे शक्य हाेत नाही. त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी झाल्याने मर्यादीत स्वरुपात फराळ तयार करणे किंवा तयार फराळाचे पदार्थ घेण्यास महीला वर्गाची पसंती मिळत आहे.

  गेल्या ४५ वर्षे केटरींगचा व्यवसाय सांभाळणाऱ्या सुरेखा जाधव या विषयी म्हणाल्या, ‘‘पुर्वी आम्ही दिवाळीला मागणीनुसारचं फराळाचे पदार्थ तयार करून देत असाे. परंतु आता तयार पदार्थाची मागणी माेठ्या प्रमाणावर वाढली आहे. अर्थातच हे फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल हा देखील चांगल्या प्रतिचा असावा याची काळजी घ्यावी लागते. चांगल्या प्रतिचे तेल, साजुक तुपाचा वापर करावा लागताे. पदार्थाची चव चांगली असेल, तसे जास्त दिवस टिकले पाहीजे, याची काळजी करावी लागते.’’

  व्यावसाियक सनी निम्हण म्हणाले, ‘‘ तयार फराळाच्या पदार्थांना समाजातील सर्वच स्तरातील महिला, कुटुंबांकडून मागणी असते. त्याचप्रमाणे माॅलमध्ये देखील तयार फराळाचे पदार्थ विक्रीस ठेवले जात आहे. तेथेही त्याला मागणी असते.

  माेठ्या प्रमाणावर राेजगार

  तयार फराळ पदार्थ तयार करून देण्याचे काम हे अनेक महिला बचत गट करीत आहेत, तसेच अनेक महीला या घरगुती स्वरुपात फराळाचे पदार्थ तयार करून देतात. महिला संचलित काही संस्थांकडून तयार फराळाचे उत्पादन आणि विक्री केली जाते. केटरिंग व्यावसायिंकाकडूनही फराळाचे पदार्थांचे उत्पादन माेठया प्रमाणावर केले जात असून, यातून माेठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल हाेत असुन, राेजगार निर्मिती हाेत आहे.