मावळ तालुक्यात मतदानाची तयारी पूर्ण, ३९० केंद्रांवर होणार मतदान; तब्बल ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मावळ तालुक्यात ३९० मतदान केंद्र असून या ठिकाणी ३ लाख ७३ हजार ४०८ मतदारांना मतदान करण्यास संधी आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

  तळेगाव दाभाडे : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३)रोजी मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ तालुका हा महत्त्वाचा मानला जातो. तालुक्यात तळेगाव, लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत असा शहरी तर बहुसंख्या ग्रामीण भाग आहे. तालुक्यात ३९० मतदान केंद्र असून या ठिकाणी ३ लाख ७३ हजार ४०८ मतदारांना मतदान करण्यास संधी आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मतदान प्रक्रियेसाठी तीन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, २०४ मावळ विधानसभा मतदारसंघ तथा मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  ३ लाख ७३ हजार ४०३ मतदार

  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत नवले बोलत होते. २०४ मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार ३ लाख ७३ हजार ४०८ असून त्यापैकी १ लाख ९१ हजार ७६२ पुरुष तर १८१६९३ स्त्री मतदार आहेत व १३ तृतीयपंथी मतदार आहेत. यामध्ये ३९० मतदान केंद्र असून त्यासाठी सुमारे तीन हजार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी कार्यरत आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात ४५ झोन करण्यात आले आहेत. यावर नियंत्रणासाठी सेक्टर ऑफिसरची नेमणूक केली आहे. आत्तापर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन वेळा प्रशिक्षण घेण्यात आले आहे, असे नवले यांनी सांगितले आहे.

  वयोवृद्ध व अपंगांसाठी व्हील चेअरची व्यवस्था

  मतदान केंद्रांवर वयोवृद्ध व अपंगांसाठी व्हील चेअरची व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रावर एक प्रमुख अधिकारी व इतर तीन सहायक अधिकारी, एक कर्मचारी व बंदोबस्तासाठी एक पोलीस अशा सहा जणांची प्रत्येक केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्करची नेमणूक करण्यात आली आहे.

  मतदानाच्यासाठी १३७ वाहनांना जीपीएस लावून तयार ठेवली आहे. मतदान केंद्रासाठी लागणारे सर्व साहित्याचे वाटप नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन इंजिनिअरिंग कॉलेज येथून होणार आहे. मतदान सोमवारी (दि.१३) रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे. मतदानाच्या वेळी २०० मीटरच्या आत कोणीही प्रवेश करू नये, अशा सूचना देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या आहेत.

  वाढत्या उष्णतेमुळे विशेष खबरदारी

  वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचाराची व्यवस्था केली आहे. उन्हामुळे मतदारांना त्रास झाला तर घ्यावयाची खबरदारी याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

  एक्झिट पोलला बंदी

  जनमत चाचणी, मतदारांचा कौल (एक्झिट पोल) याबाबतीत बंदी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे जाहीर करू नये, असा आदेश आहे. बंदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला.