
३१ मे रोजी दिवसभर प्रचंड उन्ह तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ढगाळी वातावरण तयार होऊन सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर विजांचा कडकडाट होऊन धुवाधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट झाल्याने शहरात सर्वत्र दाणादाण उडाली.
यवतमाळ : शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मान्सून पूर्व पावसाने धुवाधार हजेरी लावली. यावेळी अचानक आलेल्या पावसाने अनेकांची दाणादाण उडाली. तर, शहरातील गार्डन रोडसह पोलीस मुख्यालय व अबकारी कार्यालय परिसरात झाडे उन्मळून पडली. यामुळे अनेक भागात वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता.
यावर्षी उन्हाळ्यात सूर्य चांगलाच आग ओकत आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यातच काही दिवसांपासून उन्हासह ढगाळी वातावरणही तयार होत आहे. तर काही भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाडा अधिकच वाढला. असे असतानाच मंगळवारी ३१ मे रोजी दिवसभर प्रचंड उन्ह तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ढगाळी वातावरण तयार होऊन सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर विजांचा कडकडाट होऊन धुवाधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट झाल्याने शहरात सर्वत्र दाणादाण उडाली.
यावेळी शहरातील अनेक मार्गांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. तर काही सखल भागातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यवसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर शहरातील गार्डन रोड परिसरात असलेली दोन झाडे वादळाने तुटल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील मध्य वस्तीत असलेल्या आझाद मैदानातील मीना बाजारात तर वादळाने अक्षरशः धुमाकूळ घातला. यावेळी मीना बाजारातील संरक्षक भिंत पूर्णतः कोसळली. सुदैवाने यात कुठलाही जीवित हानी झाली नाही
पोलीस मुख्यालय, एक्साईज कार्यालयात झाडे कोसळली
शहरातील पोलीस मुख्यालय, उत्पादन शुल्क विभाग, कृषी विभाग आदी कार्यालय असलेली झाडे पडली. उत्पादन शुल्क विभागात एका अधिकाऱ्याच्या वाहनावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तर पोलीस मुख्यालयातील एका कार्यालयावर झाड कोसळले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यामध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला होता.