सुनावणीस हजर राहा अन्यथा…; राणा दाम्पत्याला कोर्टानं चांगलंच झापलं

शिवसेना उ.बा.ठा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करणारे बडनेराचे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  अमरावती : शिवसेना उ.बा.ठा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करणारे बडनेराचे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  या प्रकरणात गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळीही दाम्पत्य गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचे कठोर निर्देश देतानाच अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याचाही इशारा दिला आहे. यापूर्वी राणा दाम्पत्याचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. गुरुवारी त्यांच्याविरोधात आरोपनिश्चिती होणार होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीवेळी राणा दाम्पत्य विशेष सत्र न्यायालयात उपस्थित नव्हते.

  न्यायमूर्ती संतप्त

  आपण लोकप्रतिनिधी असून, जनतेच्या काही महत्त्वाच्या कामांमुळे आपल्याला न्यायालयात उपस्थित राहता येणार नसल्याचे त्यांनी वकिलांमार्फत कळवले. मात्र, हे ऐकताच न्यायमूर्ती संतापले. त्यांनी कडक शब्दांत राणा दाम्पत्याच्या वकिलांना सुनावले की, राणा दाम्पत्य पुढल्या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित न राहिल्यास त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना न्यायालयासमोर आणण्यात येईल,

  दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

  एप्रिल 2022 मध्ये राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठणाचा दिखावा केला होता. त्या कृत्यातून सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाल खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. या गुह्यात दोषमुक्त करण्याची विनंती राणा दाम्पत्याने केली होती.