President Draupadi Murmu's presence at the centenary celebrations of Kaivalyadham Yoga Institute in Pune
President Draupadi Murmu's presence at the centenary celebrations of Kaivalyadham Yoga Institute in Pune

  पुणे : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा आणि ‘शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपती श्रीमती मुर्मू बोलत होत्या.
  ‘कैवल्यधाम’च्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी
  कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री तथा शताब्दी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी, सचिव सुबोध तिवारी आदी उपस्थित होते. स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेल्या ‘कैवल्यधाम’च्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आनंद झाला, असे सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, भारताचे योग शिक्षण ही जागतिक समुदायासाठी आपली अमूल्य देणगी आहे.
  आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन
  भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. योग प्रणाली ही आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करते आणि ती संपूर्ण जागतिक समुदायाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्पष्ट केले आहे.
  योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान
  त्या पुढे म्हणाल्या, योगाच्या अमूल्य ज्ञानाचा आपल्या मुलांना आणि आपल्या तरुण पिढीला फायदा व्हायला हवा या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेत असलेल्या योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. प्राचीन भारतातील गुरुकुलमध्ये शिकणारे विद्यार्थी, बौद्धिक ज्ञान तसेच आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असत. आपल्या विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन परंपरेच्या उपयुक्त घटकांशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
  आपल्या परंपरेत कैवल्य म्हणजेच मोक्ष हा सर्वोत्तम प्रयत्न
  आपल्या परंपरेत कैवल्य म्हणजेच मोक्ष हा सर्वोत्तम प्रयत्न मानला जातो. अर्थ, काम आणि धर्म या पायऱ्या पार करून माणसाला कैवल्य प्राप्त करायचे असते. व्यावहारिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान एकमेकांना पूरक असल्याचे इश उपनिषदात स्पष्ट केले आहे. समग्र शिक्षणामध्ये व्यावहारिक आणि आध्यात्मिक ज्ञानाची सांगड घातली जाते.
  योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त
  योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त आहे हे सत्य आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी विस्तृत संशोधन आणि चाचण्यांनंतर मांडले होते. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात योगविषयी महत्वपूर्ण संशोधन संकलित केले. विसाव्या शतकात स्वामी कुवलयानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींनी योगपद्धतीची वैज्ञानिकता आणि उपयोगिता नव्या ऊर्जेने मांडली. योग आणि आध्यात्मावर आधारित आधुनिक विज्ञानातील तत्वे त्यांनी जागतिक समुदायासमोर मांडली.
  अनेक मान्यवर स्वामी कुवलयानंद यांच्या संपर्कात
  राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर स्वामी कुवलयानंद यांच्या संपर्कात होते. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा देशातील महान व्यक्तिमत्त्व आणि सामान्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. स्वामीजींची योग शिकवण त्यांच्या शिष्य परंपरेने पुढे नेली जात आहे असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
  कैवल्यधामच्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनात सहभागी
  आपल्याला रायरंगपूर, ओडिशा येथील ‘श्री अरबिंदो इंटेग्रल एज्युकेशन सेंटर’ मध्ये शिकविण्याची आणि आज कैवल्यधामच्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनात सहभागी होण्याची संधी मिळाली हे आनंददायी असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. स्वामी कुवलयानंद शाळांमध्ये योगशिक्षणाच्या प्रसाराला खूप महत्त्व देत असत. कैवल्यधाम संस्थान संचालित कैवल्य विद्या निकेतन नावाची शाळा इतर शाळांसमोर याबाबतचे उदाहरण ठेवण्यास प्रेरणा देईल, असेही त्या म्हणाल्या.
  सुरेश प्रभू म्हणाले, लोणावळा या पुण्यभूमीत देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचे राष्ट्रपती आले आहेत. योग ही एक विद्या आहे त्यामुळे त्याचा अभ्यास व्हावा. ते शास्त्र आणि कला असल्यामुळे त्याचे आकलन, तसेच संस्कृतीचा एक हिस्सा असल्यामुळे त्याचे जतन व्हावे. आस्था असल्यामुळे स्मरण व्हावे, आध्यात्म असल्यामुळे चिंतन व्हावे आणि स्वीकार व्हावा म्हणून विश्लेषणही झाले पाहिजे. या सर्व बाबी कैवल्याधम येथे एकच ठिकाणी मिळतात. कैवल्यधाम हे येणारी हजारो वर्षे विश्वाला ऊर्जा देणारे स्थान ठरेल, असेही श्री. प्रभू म्हणाले.
  यावेळी संस्थेचे सचिव श्री. तिवारी यांच्याकडून स्वागत
  याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच कैवल्यधाम प्रकाशनाच्या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपती महोदयांनी कैवल्यधामचा इतिहास चित्ररूपाने मांडणाऱ्या गॅलरीला भेट देऊन पाहणी केली.