राष्ट्रपतिपदाचे उमेदवार शरद पवार असावेत : सचिन खरात

आगामी राष्ट्रपति निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नाव असावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात पक्ष) प्रदेशाध्यक्ष सचिन खरात यांनी पिंपरी येथे केली.

    पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचे रक्षण होण्यासाठी देशाचे राष्ट्रपती फुले, शाहू, आंबेडकरांचा समतेचा विचार पुढे नेणारे असावेत. त्यासाठी आगामी राष्ट्रपति निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नाव असावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात पक्ष) प्रदेशाध्यक्ष सचिन खरात यांनी पिंपरी येथे केली.

    पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खरात बोलत होते. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्षद वनशीव, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय चोपडे, पुणे शहराध्यक्ष प्रियंका शिंदे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन कांबळे, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष खलीलभाई कुरेशी आदी उपस्थित होते.

    यावेळी सचिन खरात यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, भाजपा हा जातीयवादी आणि भांडवलदारांचा पक्ष आहे. ज्या मनुवादी विचारसरणीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना त्रास दिला. त्याच विचारधारेतील व्यक्तींनी मंगळवारी देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपमान केला. हा अजित पवार यांचा अपमान नसून महाराष्ट्राचा आणि संविधानाचा अपमान आहे. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

    तसेचं पुढील काळात संविधान धोक्यात येण्याची भीती आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्व उपेक्षित घटकांनी एकत्र येऊन जातीयवादी आणि भांडवलदार पक्षाचा विरोध केला पाहिजे. राज ठाकरे हे धर्मनिरपेक्ष नसून ते एका जातीचे पुरस्कर्ते आहेत. ओबीसी आरक्षण १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी दिले. त्या विरोधात भाजपने कमंडलू यात्रा काढली याची गोपीचंद पडळकर यांनी माहिती घ्यावी अशीही टीका खरात यांनी केली.

    उपेक्षितांना रिपब्लिकन पक्षच न्याय देऊ शकतो. पण त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकत्र येऊन उपेक्षितांना न्याय द्यावा. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करण्यासाठी काही नागरिकांनी मागणी केली आहे. या विद्यापीठाच्या नामांतरासाठी १७ वर्ष लढा दिला आहे. उलट या विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

    भारतीय जनता पार्टीला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आरपीआय (खरात पक्ष) गेली नऊ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर काम करीत आहे. आगामी काळात होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला (खरात पक्ष) पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्र. २९, प्रभाग क्र. ४३, प्रभाग क्र. २२, प्रभाग क्र. ११, प्रभाग क्र. ३९ आणि प्रभाग क्र. २४ येथील एकूण ७ जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती सचिन खरात यांनी यावेळी दिली.