स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची बतावणी ; भोंदूगिरी प्रकरणी महिलांसह तिघांवर गुन्हा

- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे भोंदूगिरी उघड

    पुणे : स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासोबतच नैराश्य दूरकरून तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला देऊन भोंदूगिरीचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड केला असून, या तरुणाची दीड लाखांची फसवणूक देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

    याप्रकरणी वृषाली संतोष ढोले-शिरसाट (वय ३९, रा. वंशज गार्डन, पाषाण), माया राहुल गजभिये (वय ४५, रा. विठ्ठलनगर, पाषाण), सतीश चंद्रशेखर वर्मा (वय ३३, रा. गणेश हाॅस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक संभाजी गुरव, उपनिरीक्षक विद्या पवार आणि पथकाने कारवाई केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाणमध्ये एक महिला आणि तिचे साथीदार भोंदूगिरी करत असल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल यांना मिळाली होती. त्यानंतर विशाल आणि कार्यकर्त्यांनी याप्रकरणाची शहानिशा केली. अंनिसचे कार्यकर्ते पोलिसांसह पाषाण येथे गेले. वृषाली आणि साथीदारांनी गुरुदत्त कन्सल्टन्सी ही संस्था सुरू केली होती. त्यांनी कार्यकर्त्यांना १ हजार रुपये भरण्यास सांगितले. कार्यकर्ते विशाल कार्यालयातील एका खोलीत गेले. वृषालीने त्यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. भोंदूगिरी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस खोलीत गेले. पोलिसांनी पंचनामा करून जादूटोण्याचे साहित्य जप्त केले.

    दरम्यान स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने एक तरुण नैराश्यात होता. जाहिरात पाहून तरुण तेथे गेला. दैवी शक्ती असल्याची बतावणी करून वृषाली आणि साथीदारांनी तरुणीकडून दीड लाख उकळले. वृषालीने पाय धुतलेले पाणी तरुणाला प्यायला दिले. तिने तरुणाचे मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.