लीटरमागे दुधाला देशी दारूच्या चपटीइतकी किंमत द्या ; सदाभाऊ खोत यांची मागणी

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशी दारूच्या 180 मिलीच्या एका चपटीची किंमत 90 रुपये आहे आणि 1 हजार मिली दुधाची किंमत 30 रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्याला देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

    राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशी दारूच्या 180 मिलीच्या एका चपटीची किंमत 90 रुपये आहे आणि 1 हजार मिली दुधाची किंमत 30 रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्याला देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे. आज सदाभाऊ खोत हे जालन्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

    राज्यात ज्याला साखर कारखाना काढायचा आहे त्याला काढू द्या, त्यासाठी दोन कारखान्यातील हवाई अंतराची अट काढून टाका. हवाई अंतराची अट म्हणजे साखर कारखानदाराला 25 किलोमीटर परिसरात लुटण्याचे लायसन्स असल्याची टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

    तेलबिया पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात देशात होत आहे. आणि अन्य देशातून येणाऱ्या खाद्यतेलाला आयात शुल्क नाममात्र आहे. म्हणून आम्ही सरकारला मागणी केली आहे की, बाहेरून येणाऱ्या खाद्यतेलावर २५ ते ३० टक्के आयात शुल्क लावा, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

    सरकार सत्तेत आल्यापासून भाजपला घटक पक्षाची आठवण झाली नसल्याची खंत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामुळे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदाची संधी मिळणार का असाप्रश्न विचारला असता, राज्यात सरकार आलं मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना अद्याप घटक पक्षाची आठवण झालेली नाही, की बैठक बोलवायची, की अजून नंबर आला नाही, असे खोत यांनी म्हटले आहे.

    त्याचबरोबर आम्ही भाजपसोबत आहोत असे म्हणतो मात्र ते अजून काय आम्ही सोबत असल्याचे म्हटले नाही. प्रत्येकाची एक वेळ येत असते. त्यामुळे आम्ही वाट पाहून आहोत असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.